तरुण ठरला पाणी टंचाईचा बळी

dead_body.
dead_body.

दोंडाईचा : विखरण (देवाचे, ता. शिंदखेडा) येथे आठ महिन्यापासून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी व बोअर आटल्या आहेत. विहीर अधिग्रहणकरण्यासाठी विहिरींना स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात भुरेसिंग विजयसिंग गिरासे (वय 29) याचा पाणी आणताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. हा पाणी टंचाईचा बळी ठरला असल्याचा आरोप त्यास श्रद्धांजली वाहताना ग्रामस्थांनी केला. 

विखरणला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. परिसरातही पाण्याचा स्रोत नाही. मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रयत्नाने दोन महिन्यापूर्वी पाण्याचे टॅंकर सुरू झाले. परंतु दिवसभरातून दोन ते तीन लाख लिटर पाणी अपेक्षित असताना फक्त सत्तर ते ऐंशी हजार लिटर पाणी मिळते. ते पाणी नळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टाकले जाऊन प्रभाग नुसार पाणी वाटप होते. या नियोजनात वीस ते बावीस दिवसानंतर ग्रामस्थांना पाणी मिळते. म्हणून इतर दिवस पाणी शोधावे लागते. 

शेतीचा पूरकधंदा म्हणजे दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला. पाण्याअभावी दुभती जनावरे कवडीमोल भावाने विकली गेली आहेत. 

तापी योजना व्हावी 
विखरणपासून दहा किलोमीटर अंतरावर तापी नदी आहे तेथून तातडीने पाइपलाइन करून विखरणच्या पाझर तलावात पाणी टाकले, तर विखरणसह परिसरातील पाच गावांचा पाणीप्रश्न सुटून शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल. या योजनेला दोन कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च येणार आहे. 

गावबंदी केली दुर्लक्षित 
कार्तिकी एकादशीला विखऱण येथे भगवान श्री द्वारकाधिशांची यात्रा भरते. पाणी टंचाईकडे सर्वपक्षीय नेत्यांचे व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जावे म्हणून, यात्रेसाठी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा ठराव केला. तेव्हा नेत्यांनी ग्रामस्थांची अडचण समजून घेतली असती तर तातडीची पाणी योजना कार्यान्वित झाली असती. भूरेसिंगसारख्या तरुणाचा बळी गेला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे. 

तर मृत्यू झाला नसता.. 
भूरेसिंग गिरासे (29) 2 जानेवारीला सांयकाळी साडेसहाला शेतातून घरी येत होता. येताना बैलगाडीवर शेतातून पाण्याच्या दोन टाक्‍या भरून आणल्या. त्यातील पाणी टिल्लू मोटार लावून घरात उपसा करत होता. त्यावेळी बैलगाडीत वीजप्रवाह उतरला. भुरेसिंगला शॉक लागून तो कोसळला. त्याला तत्काळ दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच मृत झाल्याने त्याच्यावर विखरण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विखऱण व परिसरातील ग्रामस्थांची मोठया संखेने उपस्थित होती. 
भुरेसिंगचा दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगा, आई व वडील, पत्नी असा परिवार आहे. पाणी सुरळीत आले असते, टंचाई नसती तर मुलाचा मृत्यू झाला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com