प्रेयसीला भेटणे तरुणाला पडले महागात 

प्रेयसीला भेटणे तरुणाला पडले महागात 

जळगाव - शहरातील एका प्रेमवीराला प्रेयसीला भेटणे चांगलेच महागात पडले. मू. जे. महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या तरुणाने आपल्या प्रेयसीला काल रूमवरच बोलावून घेतले. मात्र, त्याचवेळी ‘पोलिस’ असल्याची बतावणी करून काही तरुणांनी दार ठोठावले. दार उघडताच संबंधित तरुणाच्या कानफट्यात लगावून एकाने त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे शूटिंग करून घेत ‘ब्लॅकमेल’ करीत तब्बल १४ हजार ५०० रुपयांची खंडणी उकळून पोबारा केल्याची घटना काल दुपारी घडली. 

शहरातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणाचे एका मुलीशी प्रेमसंबंध जुळले. दोघेही वेळ-काळ संधी मिळाली तर..घर मालकाला सांगूनच रुमवर भेटतात. आज रविवार आणि अभ्यास, क्‍लास नसल्याने संतोष परब (काल्पनिक नाव) या तरुणाने भेटीचा बेत आखला. तिचाही होकार असल्याने दोघेही संतोष राहत असलेल्या मू. जे. महाविद्यालय परिसरातील रुमवर भेटणार होते. दीड वाजता प्रेयसी पूजा जेवणाचा डबा घेऊन धडकली. दोघांनी सोबत जेवण केल्यानंतर खोलीतच गप्पा मारण्यात गुंग असताना दाराची कडी वाजली. संतोषने कोण आहे असा आवाज दिला. तिकडून ‘पोलिस’ म्हणताच संतोषने दार उघडले. दार उघडताच दोन-तीन तरुण त्याला धडशी मारत खोलीत शिरले. एकाने संतोषच्या कानफट्यात मारून दुसऱ्याने मोबाईल शूटिंग सुरू ठेवले होते. मोबाईलमध्ये सर्व घटनाक्रम मारहाण आणि बोलणे रेकॉर्ड झाल्यावर प्रियकर-प्रेयसीच्या एका कागदावर सह्या घेण्यात येऊन त्यांना पन्नास हजारांची मागणी करण्यात आली.  तोपर्यंत या भामट्यांनी मुलीला खोलीत डांबून ठेवले होते. खिशात पैसे नसल्याने नाइलाजास्तव संतोष परब याने एकाकडून वडिलांचा अपघात झाल्याचे सांगत दहा हजार मागवून घेतले. उर्वरित एटीएममधून काढून तिघा, चौघांना १४ हजार ५०० रुपये करून दिल्यावर त्यांनी मुलीला जाऊ दिले. मोबाईलमधील शूटिंग मात्र त्यांनी डिलीट केलेली नसल्याने घडल्याप्रकाराने व्यथित तरुणाने अखेर पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडली. 

मित्रांनीच रचला सापळा 
मू. जे. महाविद्यालयाजवळील ९० डिग्री परिसरात शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी भाड्याने रूम करून राहतातच. त्यातीलच एक जण संतोषच्या ओळखीचा आहे. तो त्या तोतया पोलिसांना घेऊन रूमवर आला होता. खोलीबाहेर साहेबांची गाडी उभी असल्याचे सांगत प्रियकर-प्रेयसीला या भामट्यांनी अडीच तास वेठीस धरले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com