‘वाकाड रे बबल्या`वरून नवी हिंगणीत तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

नवी हिंगणी (ता. शहादा) येथे ‘वाकाड रे बबल्या’ हे अहिराणी गीत आपल्याकडे पाहत म्हणत असल्याचा राग येऊन एकाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत सारंगखेडा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (ता. २८) रात्री ही घटना घडली आहे.

शहादा - नवी हिंगणी (ता. शहादा) येथे ‘वाकाड रे बबल्या’ हे अहिराणी गीत आपल्याकडे पाहत म्हणत असल्याचा राग येऊन एकाचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत सारंगखेडा पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल (ता. २८) रात्री ही घटना घडली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी हिंगणी (ता.शहादा) येथील रहिवासी भीमराव सदाशिव पवार (वय ३५) हा अहिराणी गाणे ‘वाकाड रे बबल्या’ म्हणत असल्याने मंगलाबाई रमेश भिल, मीनाबाई मिथुन भिल, प्रवीण रमेश भिल, सागर रमेश भिल यांना राग आला. त्यांंनी भीमराव पवार याला शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता? असा जाब विचारण्यास भीमराव पवार गेला असता, रात्री नऊच्या सुमारास वरील चारही संशयितांसह मंगलाबाई भिल व सागर रमेश भिल यांनी संगनमताने हाताबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने भीमराव पवार यास मारहाण केली. संशयितांच्या घरासमोर अंगणात भीमरावला खाली पाडून प्रवीण रमेश भिल याने त्याच्याकडे असलेल्या कुऱ्हाडीने भीमरावच्या डोक्यात तीन ते चार वार केले. त्यात भीमराव जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती गावात समजताच  खळबळ उडाली. यानंतर मोठी गर्दी जमा झाली होती. मृताची पत्नी छायाबाई पवार यांनी सारंगखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चारही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारंगखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश न्याहदे तपास करीत आहेत. मृत भीमराव पवार याच्यामागे पत्नी, तीन मुलगे, भाऊ असा परिवार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Murder Crime

टॅग्स