युवा खेळाडूला वाहतूक पोलिसांकडून मारहाण 

Youth player assaulted by traffic police
Youth player assaulted by traffic police

नाशिक : गुडघ्यावरील लिगामेंटचा उपचार करण्यासाठी दुचाकीवरून मित्रासमवेत आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात जाणाऱ्या युवा क्रिकेटपटूला वाहतूक पोलीसांनी अडविले आणि हेल्मेट नसल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. अमृतधाम पोलिस चौकीत असलेल्या उपनिरीक्षकाने तर त्यावर कडी करीत, पोलिसांविरोधात तक्रार केली तर संपूर्ण करियर बर्बाद करण्याची धमकीच देऊन टाकली. मात्र दुखण्यामुळे आणि त्यात पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे रडणाऱ्या युवा खेळाडूंची खाकी वर्दीतील कोणालाही दया आली नाही. 

जयेश जिभाऊ अहिरे (21, रा. अशोकनगर, सातपूर) हा युवा क्रिकेटपटू त्याच्या मित्रासह दुचाकीवरून आज सकाळी आडगावच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात गुडघ्यावरील उपचारासाठी जात होता. पंचवटीतील अमृतधाम चौफुली येथे वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्यांना अडविले. हेल्मेट वगळता साऱ्या बाबींची पूर्तता होती. तरीही त्यासाठी त्यांनी दुचाकी जमा करून घेत स्वामीनारायण पोलीस चौकीत आणली. तर जयेशला अमृतधाम चौफुलीवर उतरवून दिले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो पोलीस चौकीमध्ये जाऊन बसला. त्यावेळी तेथे असलेले वाहतूक पोलीस अशोक बस्ते यांनी त्यास अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करीत, चौकीतून बाहेर काढताना मारहाण केली. या मारहाणीत अशोक बस्ते यांच्या हाताच्या नखांच्या जयेशला जखमा झाल्याने त्याने, विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी तक्रार करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी चौकीत असलेले उपनिरीक्षक दीपक गिरमे यांनी तक्रार न घेता उलट त्यालाच दमबाजी सुरू केली. तक्रार देशील तर तुझे करियर बर्बाद करण्याची धमकीही देऊन टाकली. त्यामुळे हवालदिल झालेल्या जयेशने प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी पुन्हा दीपक गिरमे यांचे पित्त खवळले आणि पुन्हा बातमी जर छापून आली तर तुझे काही खरे नाही अशी धमकीच देऊन टाकली. त्यामुळे जयेशने चौकीतून काढता पाय घेतला. 

पोलीस आयुक्तांच्या प्रयत्नांना 'पोलिसां'कडूनच खिळ

वाहतूक पोलीसांनी रिक्षाचालकांसह नागरिकांकडून चांगल्या वर्तणूकीची अपेक्षा बाळगत सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उपक्रम राबवितात. परंतु, त्याच पोलीस कर्मचाऱ्यांकडून होणारी सर्वसामान्यांची पिळवणूक - अडवणूक थांबताथांबत नाही. कारवाईच्या नावाखाली वाहतूक शाखेकडून सर्रासपणे आर्थिक वसुली सुरू आहे. वाहतूक ठेकेदाराशी हातमिळवणी करून वाहतूक पोलीस बख्खळ कमाई करीत आहेत. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याकडे सोयीस्कररित्या दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांकडून नाशिकच्या लौकिकात भर पडावी यासाठी प्रयत्न केले जात असताना, पोलिसांच्या अशा पराक्रमांमुळे खिळ बसते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com