Dhule News : 5 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या श्वानाचे युवकांनी वाचविले प्राण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth saved life of dog that fell in the well dhule news

Dhule News : 5 दिवसांपासून विहिरीत पडलेल्या श्वानाचे युवकांनी वाचविले प्राण!

शिंदखेडा (जि. धुळे) : शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या कोरड्या विहिरीत पाच दिवसांपासून पडलेल्या श्वानाला (Dog) शहरातील काही तरुणांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढले. (youth saved life of dog that fell in the well dhule news)

चार ते पाच दिवसांपासून बस स्टॅंड परिसरातील विहिरीत हा कुत्रा पडलेला होता. या विहिरीजवळून कॉलनी परिसरातील येण्या-जाण्याचा रस्ता आहे. या रस्त्याने जात असताना नागरिकांनी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकला.

विहिरीत डोकावून पाहिले असता कुत्रा पडल्याचे लक्षात आले. विहीर १५ ते २० फूट खोल असल्याने या कुत्र्यास वर काढणे शक्य होत नव्हते. कॉलनीतील ओम सूर्यवंशी, साहिल ईशी, गौरव गायकवाड, तुषार सोनवणे, मंगेश गोसावी, दिनेश गोसावी या युवकांनी कुत्र्यास बाहेर काढण्याचा निर्धार केला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

खाटेला चारी बाजूंनी दोर बांधून ती खाट विहिरीत टाकली व त्यावर कुत्र्याला चढवून तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कुत्र्यास विहिरीबाहेर काढण्यात यश आले. उपाशीपोटी व भीतीने व्याकूळ झालेल्या या कुत्र्याला स्वच्छ धुऊन मलमपट्टी करून सोडण्यात आले. कुत्र्याचे प्राण वाचविल्याने युवकांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :DhuleYouthDogBus Stand