तरुणाई अडकलीय गेमिंगच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

पुस्तकाचा वेळ घेतला यूट्यूब, वेबसिरीजने 
सध्याच्या डिजिटल युगात तरुणाईचा पुस्तकवाचनाचा वेळ यूट्यूब आणि वेबसिरीजने हिरावून घेतल्याचे दिसतेय आहे. तरुणांसह लहान मुलांनाही यूट्यूबचे वेड लागले आहे. पुस्तकांपेक्षा लोकांचे मन सोशल मीडियात रमल्याचे दिसून येते.

नाशिक - इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाची वाट सुकर झाली. अद्ययावत माहिती क्षणार्धात उपलब्ध करून देणारे इंटरनेटचे जाळे आता तरुणाईलाच मायाजाळात अडकवत आहे. सायबर कॅफे किंवा मोबाईलवर एका क्‍लिकवर उपलब्ध खेळांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच गेमिंग, कॅफे आणि स्मार्टफोनमधील भन्नाट ॲप्सनी अक्षरशः वेड लागले आहे. 

गेमझोन, सायबर कॅफे किंवा अगदी स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असलेल्या गेम्समुळे अनेकांचा वेळ वाया जात आहे. सबवे सर्फर, टेम्पल रन, क्‍लॅश ऑफ क्‍लॅन्स, पोकेमॉन गो यांबरोबर सध्याचा पब्जी यांसारख्या मोबाईल गेममुळे मुले तासन्‌तास स्मार्टफोनमध्ये रमत असल्याचे दिसून येत आहे.
पालकांना माहीतही नसलेल्या फिफा १८, सिएसगो, काउंटर स्ट्राइक, फोर्टनाइट यांसारखे अनेक खेळ तरुणाई व शाळकरी मुलांना तोंडपाठ झाले आहेत. शहरातील विविध गेमझोन, सायबर कॅफेंमुळे महाविद्यालयीन तरुणांबरोबरच शाळकरी मुलांमध्येही गेम्सचे आकर्षण निर्माण झाले आहे.

गेमझोनमध्ये खेळण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसल्यामुळे शाळा, तसेच कॉलेजमधील तासिका बंक करून मुले गेमझोनमध्ये खेळत आहेत. शहरात जवळपास पन्नासहून अधिक गेमझोन आहेत. या ठिकाणी तासभर गेम खेळण्यासाठी ३० ते ५० रुपये मोजावे लागतात. मात्र तासभर खेळून समाधान होत नाही त्यामुळे मुलांकडून अधिक पैसे देऊन वेळ वाढवूनही घेतला जातो. अशीच परिस्थिती सायबर कॅफेंमध्येही बघण्यास मिळते.

व्हर्च्युअल गेम्सचा इतका पगडा तरुणांच्या आयुष्यावर आहे, की फुटबॉल, क्रिकेटसुद्धा ते मोबाईलवर खेळू लागले आहेत. हे एक नवे व्यसनच झालेय. अगदी ट्रेनमधल्या फावल्या वेळेपासून ते सायंकाळी निव्वळ टाइमपास करण्याच्या उद्देशाने आज मोबाईलवर गेम्स खेळणे हा एकच पर्याय निवडला जाऊ लागलाय.

सततच्या गेमिंगमुळे मुलांमधील आक्रमकता वाढली आहे. यामुळे मुलांच्या मानसिक, तसेच शारीरिक आरोग्यावरही परिणाम होताना दिसतो. काल्पनिक जग आणि वास्तववाद यातील फरक न समजल्यामुळे अनेकांना नैराश्‍याने ग्रासल्याची उदाहरणे आहेत. 
- डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Smartphone Game Nest Dangerous