रोजगार फळ्यामुळे २० हजार युवकांना काम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

शहरात उभारणार पाचशे फळे, प्रत्येक प्रभागात आठ

नाशिक - वेल्डर, फिटर व केटरर्स अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांना एकीकडे मनुष्यबळाचा तुटवडा भासतो, तर दुसरीकडे नोकरी उपलब्ध असली, तरी गरजूंपर्यंत योग्य माहिती पोचत नाही. हा दुवा सांधण्यासाठी महापालिकेने ‘रोजगार फळा’ संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक प्रभागात आठ, असे शहरात पाचशेहून अधिक रोजगार फळे उभारून त्यावर रोजगाराची माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी रोजगार फळा संकल्पना मांडली आहे. इंटिग्रेटेड रुरल लाइव्हलीहूड डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली जाणार आहे. महासभेवर तसा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, मंजुरीनंतर तत्काळ फळे उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. रोजगार फळाच्या माध्यमातून शहरात मोठ्या कंपन्या, तसेच अगदी किरकोळ आस्थापनांमधील रिक्त पदे किंवा गरजेच्या पदांची माहिती फळ्यावर मांडली जाणार आहे. संबंधित संस्थेची माहिती, पत्ता व मुलाखतीचे ठिकाण त्यावर दिले जाणार आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर नियुक्त करून दररोज माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील मुख्य चौक, सिग्नल व वर्दळीच्या ठिकाणी, असे फळे उभारले जातील. एका फळ्यासाठी वार्षिक १८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षांत २० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

तीन हजार महिलांना चालक प्रशिक्षण
शहरात महिला चालकांची गरज ओळखून रोजगार फळाप्रमाणेच सहा विभागांतील प्रत्येकी पाचशे, असे एकूण तीन हजार महिलांना चारचाकी, रिक्षा व अवजड वाहने चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षणाबरोबरच परवानासुद्धा महापालिकेतर्फे काढून दिला जाणार आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार देण्याचे नियोजन असल्याचे स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी सांगितले. प्रशिक्षणासाठी प्रतिमहिला साडेचार हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title: youth work by municipal