पेठच्या तरुणाकडून अराजकतेवर योगसाधनेद्वारे उत्तर

विनोद बेदरकर
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अमेरिका- इराक युद्धाच्या भौगोलिक कारणमीमांसेवर डॉक्‍टरेक्‍ट मिळविली आहे. आता त्यांची दिल्लीच्या भारतीय अनुसंधान परिषदेने उच्च संशोधनासाठी निवड केली आहे. ‘योगसाधना’ हेच अराजकतेवर कसे उत्तर आहे, हे ते संशोधनातून मांडतील.

नाशिक - आंबे शिवशेत (ता. पेठ) सारख्या दुर्गम, आदिवासी पाड्यातील डॉ. रमेश गायकवाड या तरुणाने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अमेरिका- इराक युद्धाच्या भौगोलिक कारणमीमांसेवर डॉक्‍टरेक्‍ट मिळविली आहे. आता त्यांची दिल्लीच्या भारतीय अनुसंधान परिषदेने उच्च संशोधनासाठी निवड केली आहे. ‘योगसाधना’ हेच अराजकतेवर कसे उत्तर आहे, हे ते संशोधनातून मांडतील.

जिओ-पॉलिटिक्‍स विषय घेतलेल्या डॉ. गायकवाड यांच्या संशोधक वृत्तीच्या गतीची भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने दखल घेत ‘सीनिअर ॲकॅडमिक रिसर्च’साठी निवड केली. ‘जागतिक शांततेसाठी योगाचे योगदान’ असा डॉ. गायकवाड यांच्या संशोधनाचा विषय आहे. त्यांना ज्या संस्थेमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेता आले, त्या संत जनार्दन स्वामी आश्रमावरील ‘श्रद्धा’ म्हणून आदिवासी भागात मुलांचे शिक्षण यासारखे सामाजिक कार्यही सुरू आहे. एकाच वेळी त्र्यंबकेश्‍वर व पेठ तालुक्‍यांत गोरगरीब मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबविताना संशोधन करत घेतलेली भरारी तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

अमेरिका- इराक युद्धाची मीमांसा
महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नाशिकला आले. पंचवटीतील संत जनार्दन स्वामी गुरुकुल आश्रमात महंत माधवगिरी महाराजांनी त्यांना आधार दिला. तेथे राहून पंचवटी महाविद्यालय आणि त्यानंतर पुण्यात एस. पी. महाविद्यालयातून पदवी शिक्षणानंतर त्यांची संशोधनासाठी दिल्ली गाठली. तेथे ‘जिओ-पॉलिटिक्‍स’ विषय घेऊन ‘अमेरिका-इराक युद्धामागील तेलविहिरींचे स्थान’ विषयावर डॉक्‍टरेक्‍ट मिळविली. त्यासाठी माधवगिरी महाराज, फ्रान्सिस वाघमारे यांच्यासह तत्कालीन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी मदत केली. आता अमेरिका- इराक युद्धाचा विषय योगसाधनेद्वारे ते कसा हाताळतात याबद्दल उत्सुकता आहे.

ताणतणाव, संघर्ष, स्पर्धेच्या काळात जगाला प्राणायाम, सुदर्शन, सहजयोग, राजयोग व हठयोग या पुरातन भारतीय साधनेतून मार्ग मिळू शकतो. किंबहुना जागतिक शांततेत तेच अपरिहार्य ठरेल. या विषयावर संशोधन करणार आहे.
- डॉ. रमेश गायकवाड

सामाजिक उपक्रमात सक्रिय 
मूळ आंबे शिवशेत (ता. पेठ) येथील रहिवासी असलेले डॉ. गायकवाड सध्या मेटघर किल्ला (ता. त्र्यंबकेश्‍वर) गावात राहायला आहेत. तेथे संत जनार्दन स्वामी आंतरराष्ट्रीय मिशन संस्थेंतर्गत चार आदिवासी विद्यार्थ्यांचे गुरुकुल वसतिगृहासह दीड एकरावर वनौषधी फुलविली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत मेटघर (ता. त्र्यंबकेश्‍वर) ग्रामपंचायतीने २२ एकर जागेवर त्यांना वनौषधी उद्यान फुलविण्यासाठी जबाबदारी दिली. मात्र, तीव्र पाणीटंचाईमुळे सध्या फक्त साडेचार हजार वनौषधींच्या लागवडीनंतर या उपक्रमाचा वेग तूर्तास संथ आहे.

Web Title: Youth Yog Ramesh Gaikwad America Iraq