बल्हाणेच्या तरुणांनी अनुसरला भक्तिमार्ग 

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 26 डिसेंबर 2016

म्हसदी : टीव्ही, इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात तरुणाई वाममार्गाला लागल्याची ओरड सर्वत्र होत असते. यातून राष्ट्रहिताला बाधा पोहोचत असल्याचेही सांगितले जाते. तरुणांनी ठरवले तर गावाच्या शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम होऊ शकते. याचीच प्रचिती बल्हाणे (ता. साक्री) येथील 20-22 तरुणांनी दिली आहे. 

म्हसदी : टीव्ही, इंटरनेट, मोबाईलच्या जमान्यात तरुणाई वाममार्गाला लागल्याची ओरड सर्वत्र होत असते. यातून राष्ट्रहिताला बाधा पोहोचत असल्याचेही सांगितले जाते. तरुणांनी ठरवले तर गावाच्या शहराच्या विकासाला दिशा देण्याचे काम होऊ शकते. याचीच प्रचिती बल्हाणे (ता. साक्री) येथील 20-22 तरुणांनी दिली आहे. 

व्यसनमुक्तीसाठी या तरुणांनी भक्तिमार्ग अनुसरला असून, गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत आहेत. यासाठी या तरुणांना ग्रामपंचायत सदस्य हर्शल बिरारीस यांचे पाठबळ लाभत आहे. 
बल्हाणे येथे पूर्वीपासून भजनी मंडळ अस्तित्वात आहे. दर एकादशीला मंदिरात ते भजने सादर करतात. तसेच गावातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो. या भजनी मंडळात गावातील काही तरुणही सहभागी आहेत. यात ग्रामपंचायत सदस्य बिरारीस यांचाही समावेश आहे. 

काही दिवसांपूर्वी बिरारीस यांनी आपल्या 23 ते 35 वयोगटांतील सर्व मित्रांना दिवसभर काम संपल्यावर भजन-कीर्तनासाठी वेळ द्यावा, असे आवाहन केले. त्यानुसार 20 ते 22 तरुण मित्र एकत्र आले असून, ते दर शनिवारी व एकादशीला तरुण भजन म्हणतात. या तरुणांमध्ये एक हार्मोनिअमवादक, दोन मृदंगवादक आहेत. एवढ्यावरच न थांबता हे तरुण व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेत आहेत. श्री. बिरारीस यांनी भजनी मंडळातील प्रत्येकाला भजन मालिका घेऊन दिली आहे. लवकरच सर्व साहित्यही दिले जाणार आहे. 

या तरुणांना बल्हाणे येथील कीर्तनकार नरेश अहिरराव महाराज यांचेही मार्गदर्शन लाभत आहे. गावातील तरुण भक्तिमार्गाला लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या तरुणांमधील बहुतांश जण शिक्षण पूर्ण झालेले आहेत. मात्र, उद्योग-व्यवसाय, नोकरीअभावी ते बेरोजगार आहेत. दिवसभर शेतीत काबाडकष्ट करून रात्रीच्या वेळी भजनांमध्ये ते तल्लीन होत आहेत. यात भय्या बिरारीस, अनिल कुवर, दत्तात्रय शिंपी, नाना सोनवणे, पप्पू बिरारीस, धनंजय पाटील, भूषण बिरारीस, गौरव शिंपी, हेमंत दाभाडे, दादू पाटील, मोहन अहिरराव, मयूर बच्छाव, दादू हिरे, तेजस अहिरे आदींचा समावेश आहे. 
 

Web Title: youths turn to bhajan