जळगावात "झिरो शॅडो डे'चा 26 मेस अनुभव!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पृथ्वीच्या प्रदक्षिणेतील स्थिती; सावली पायाखाली येणार

पृथ्वीच्या प्रदक्षिणेतील स्थिती; सावली पायाखाली येणार
जळगाव - दुपारी बाराला सूर्य डोक्‍यावर येतो, असे नेहमीच म्हटले जाते. प्रत्यक्षात सूर्य बरोबर डोक्‍यावर येण्याचे वर्षभरातून दोनच क्षण असतात. त्यापैकी एक 26 मेस दुपारी बारा वाजून 25 मिनिटांनी जळगावकरांना अनुभवण्यास मिळणार आहे. या दिवशी सावलीच्या घड्याळानुसार (सनडायल) 12 वाजता व आपल्या नियमित घड्याळानुसार 12 वाजून 25 मिनिटांनी सूर्य बरोबर डोक्‍यावर असेल व आपल्या सावलीने "सोबत' सोडल्याचा अनुभव येईल.

यासंदर्भात खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता; त्यांनी सूर्याभोवती पृथ्वीच्या प्रदक्षिणेतील रंजक स्थितीचे वर्णन केले. पृथ्वीवरील तीन काल्पनिक रेषांमध्ये मध्यरेषा म्हणजेच विषुववृत्ताच्या वर उत्तरेस 23.5 अंशावरील रेषेस कर्कवृत्त, तर खाली दक्षिणेस 23.5 अंशावरील रेषेस मकरवृत्त आहे. 21 मार्चला सूर्य विषुववृत्तावर अर्थात शून्य अंशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो व उत्तरायण सुरू होते. सूर्य +23.5 अंश उत्तरेस जातो. परत फिरून 22 सप्टेंबरला तो विषुववृत्तावर येतो व दक्षिणेकडे सरकायला लागतो, तेव्हापासून दक्षिणायन सुरू होते.

सूर्य वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो. इंग्रजीत त्याला "सन डेक्‍लिनेशन' (sun declination) म्हणतात. प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते. आपण कर्कवृत्ताच्या जवळ राहतो. जळगाव 21.00 अंश या अक्षांशावर आहे. 21 मार्च ते 21 जून या काळात 26 मेस सूर्याचे "डेक्‍लिनेशन' जळगावच्या अक्षांशाइतके असते. म्हणून त्या दिवशी शहरात 12 वाजून 25 मिनिटांनी "झिरो शॅडो डे' असतो. 21 जूननंतर परतीच्या प्रवासात 18 जुलैला सूर्याचे "डेक्‍लिनेशन' परत आपल्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे "झिरो शॅडो डे' असतो. अशा पद्धतीने वर्षातून दोन वेळा सूर्य 12 वाजून 25 मिनिटांनी डोक्‍यावर येतो. आता 26 मेस हा अनुभव घेता येणार असल्याचे अमोघ जोशी यांनी सांगितले.

Web Title: zero shadow day 26th may

टॅग्स