आचारसंहितेपूर्वी जि. प.साठी पक्षांतराला येणार जोर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नाशिक - नोव्हेंबरमध्ये नगरपालिका निवडणुका व आता विधिमंडळ अधिवेशन आटोपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक हालचालींना या आठवड्यापासून वेग येणार आहे. यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पक्षांतराचेही सोपस्कार पूर्ण केले जातील. यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत इनकमिंग व आउटगोइंगला जोर येणार आहे.

नाशिक - नोव्हेंबरमध्ये नगरपालिका निवडणुका व आता विधिमंडळ अधिवेशन आटोपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूक हालचालींना या आठवड्यापासून वेग येणार आहे. यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पक्षांतराचेही सोपस्कार पूर्ण केले जातील. यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत इनकमिंग व आउटगोइंगला जोर येणार आहे.

मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष होता; परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या मनी लॉंडरिंगप्रकरणी तुरुंगात असल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सदस्य यांनी जिल्हाध्यक्षांविरोधात आघाडी उघडली आहे. यामुळे अंतर्गत पक्षाला धुसफुशीचे ग्रहण लागले आहे. कॉंग्रेसची इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, बागलाण तालुक्‍यांपुरती मर्यादित ताकद आहे. भाजपला सत्तेचा उपयोग करून ग्रामीण भागात हातपाय पसरायचे आहेत; परंतु सिन्नर, मालेगाव, देवळा व चांदवडपलीकडे त्यांची उडी जात नाही. यामुळे भाजपने इतर पक्षांतील प्रबळ नेत्यांना प्रलोभने दाखविण्यास सुरवात केली आहे, पण आधी कांद्याचे कोसळलेले भाव व आता नोटाबंदी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असल्यामुळे प्रस्थापित नेत्यांपैकी कुणी भाजपच्या गळाला लागत नाही. शिवसेनेने मात्र सिन्नर, निफाड व मालेगाव तालुक्‍यातील काही प्रस्थापितांचे इनकमिंग करण्याची तयारी पूर्ण केली असून, येत्या आठवड्यात त्यांचे प्रवेश आटोपले जातील, असे अंदाज आहे.

सिन्नर तालुक्‍यातील नायगाव गटात भाजप व शिवसेनेने एकाच उमेदवारावर गळ टाकला आहे. उमेदवारानेही नगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहून निर्णय घेईल, अशी भूमिका घेतली होती. नगरपालिकेत शिवसेनेने बाजी मारल्यामुळे साहजिकच शिवसेनेला पसंती दिली जाणार आहे. निफाड तालुक्‍यातील एका कॉंग्रेस नेत्याची शिवसेनेशी असलेली जवळीक या निवडणुकीत तरी पक्षप्रवेशात बदलावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मालेगावातही ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी मतदारसंघातील हिशेब जुळविण्यासाठीही केलेल्या बेरजा प्रत्यक्षात आणण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणार आहे.

गोंदुणेतील उमेदवारीसाठी पक्षांतर
सुरगाणा तालुक्‍यात "माकप'चे वर्चस्व असल्याने तेथून निवडून येण्यासाठी माकपमध्ये प्रवेश करण्याचे सोपस्कार पार पाडण्याची परंपरा मागील पंचवार्षिकपासून सुरू झाली आहे. या वेळी सुरगाण्यातील गोंदुणे गट इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे "माकप'कडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याने गोंदुणे गटातून पत्नीची उमेदवारी निश्‍चित केल्याचे मानले जाते. आता "माकप'मध्ये केवळ पत्नीचा प्रवेश होतो की दोघांचा, हे लवकरच कळेल.

Web Title: zp election nashik