प्रत्येकी दहा रुपये घेऊन विद्यार्थ्यांना दिला मांसाहार

प्रत्येकी दहा रुपये घेऊन विद्यार्थ्यांना दिला मांसाहार

जळगाव - महेलखेडी (ता. यावल) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा- दहा रुपये जमा करून मासांहार जेवण दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रवींद्र सूर्यभान पाटील यांनी शिक्षण समिती सभेत मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी चौकशी करून मुख्याध्यापकावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश सभापती भोळे यांनी दिले. 

सभेत शालेय पोषण आहारासंदर्भात चर्चा करण्यात आली असता, शाळेतील मुलांच्या उपस्थितीनुसार आहार शिजविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावरून सदस्य रवींद्र पाटील यांनी महेलखेडी (ता. यावल) येथील शाळेतील मुलांकडून प्रत्येकी दहा- दहा रुपये जमा करून त्यांना मांसाहार जेवण देण्यात आल्याची तक्रार केली. हा प्रकार शालेय पोषण आहारासंदर्भातील निर्णयाच्या विरुद्ध असल्याने या प्रकाराची चौकशी करून शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सभेत निश्‍चित करण्यात आले. 

आरटीईच्या शाळांबाहेर लावणार फलक 
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम शाळेत 25 टक्‍के याप्रमाणे आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश दिला जात असतो. परंतु काही शाळांमध्ये प्रवेश देण्यास नाकारण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे आरटीई प्रवेशातील शाळांच्या प्रवेशद्वाराबाहेर आरटीई प्रवेश असा फलक लावण्यात येणार आहे. तसेच प्रवेशासाठीची पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून आठ लाखापर्यंत करण्यात आली असून, तसा उल्लेख देखील फलकावर करण्यात येणार आहे. 

ग्रामनिधीतून वीज बिल भरणा 
शाळेला देण्यात आलेल्या वीज जोडणीचे बिल थकले असून, हे थकीत वीज बिल ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या चौदा वित्त आयोग ग्रामनिधीतून अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सांस्कृतिक कार्यक्रम घेणाऱ्या 70 ते 80 शाळांमध्ये वाढ झाली आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून शाळांना आर्थिक योगदान मिळाले असून, ही रक्‍कम शाळेची गुणवत्ता आणि शाळेंचे आंतर व बाह्य सौंदर्य वाढविण्यासाठी वापरण्याबाबत सूचना देण्यात आल्या. 

4 मेपासून शाळांना सुट्या 
यावर्षी गुढीपाडवा व रामनवमी अशा दोन सुट्या वाढल्या आहेत. परंतु शाळांना वर्षभरात 76 दिवसांची सुटी याप्रमाणे गुढीपाडवा व रामनवमीची सुटी असल्याने उन्हाळी सुटी दोन दिवसांनी कमी केली आहे. यामुळे यंदा शाळांना 4 मे ते 14 जूनपर्यंत सुट्या राहणार आहे. तर 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com