शिवपाल यादव 'सपा'सोबतची युती तोडणार? 'काका' लवकरच दिसणार नव्या भूमिकेत I Akhilesh Yadav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav vs Shivpal Singh Yadav

काका शिवपाल सिंह यादव हे पुतणे अखिलेश यादव यांच्यावर प्रचंड नाराज आहेत.

Political News : शिवपाल यादव 'सपा'सोबतची युती तोडणार?

इटावा : सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे काका शिवपाल यादव यांच्या बंडखोर वृत्तीमुळं 'युती' तुटल्याचं मानलं जात आहे. शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) लवकरच नव्या भूमिकेत दिसणार असल्याचीही चर्चा आहे. मंगळवारी सायंकाळी 5 वाजता लखनौमध्ये समाजवादी पार्टीनं (Samajwadi Party) आघाडीशी संबंधित सर्व पक्षांच्या आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला शिवपाल सिंह यादव यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, सपाच्या प्रमुख बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी शिवपाल सिंह त्यांचे समर्थक विपिन यादव यांच्या कार्यक्रमाला भर्थना (इटावा) इथं उपस्थित राहिले. दरम्यान, शिवपाल यादव यांनी अद्याप विधानसभेचं सदस्यत्वही स्वीकारलेलं नाहीय, त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

भागवत सोहळ्यात सहभागी शिवपाल सिंह यादव यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आता काही बोलायचं नसल्याचं सांगितलं. जेंव्हा काही बोलायचं असेल, तेंव्हा सर्व माध्यमांना बोलावून आपलं म्हणणं मांडेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवपाल सिंह यादव यांची ही कणखर वृत्ती पाहून सपातील नेते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. काका शिवपाल सिंह यादव हे पुतणे अखिलेश यादव यांच्यावर प्रचंड नाराज आहेत, त्यामुळेच ते असे वागत असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मित्रपक्षांच्या आमदारांची लखनौमधील पक्ष कार्यालयात सायंकाळी 5 वाजता बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला काका शिवपाल यादव उपस्थित न राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. इटावा जिल्ह्यातील त्यांचा कार्यकर्ता विपिन यादव यांच्या भागवत कार्यक्रमाला उपस्थित राहणं शिवपाल यांनी पसंत केलं. त्यामुळं नाराजीचा सूर उमटत आहे. दरम्यान, शिवपाल सिंह यादव यांची ही बंडखोर वृत्ती पाहून उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Assembly Election) भारतीय जनता पक्षाचं सरकार (Bharatiya Janata Party Government) आल्यानंतर शिवपाल सिंह यादव भाजपच्या संपर्कात गेल्याचं बोललं जात आहे.