काँग्रेसच्या जनाधाराला लागली घरघर, जिल्हास्तरीय नेतृत्वाची पोकळी: स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दुय्यम भूमिका

राम चौधरी 
Friday, 10 July 2020

अवघ्या पाच वर्षापूर्वी जिल्हयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अव्वल असणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुय्यम भूमिकेत गेली आहे. जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणात जिल्हास्तरीय नेतृत्व नसल्याने काँग्रेसचा जनाधार राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र आहे. जिल्हास्तरीय नेत्यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर दोन तालुके वगळता काँग्रेसचे अस्तित्व इतिहास जमा होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

वाशीम : अवघ्या पाच वर्षापूर्वी जिल्हयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अव्वल असणारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुय्यम भूमिकेत गेली आहे. जिल्ह्याच्या काँग्रेसच्या राजकारणात जिल्हास्तरीय नेतृत्व नसल्याने काँग्रेसचा जनाधार राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकत असल्याचे चित्र आहे. जिल्हास्तरीय नेत्यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर दोन तालुके वगळता काँग्रेसचे अस्तित्व इतिहास जमा होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

पूर्वश्रमीचा अकोला व आताचा वाशीम जिल्हा कायम काँग्रेसचा परंपरागत गड राहिला आहे. मात्र 1989 ला वाशीम विधानसभेवर लखन मलिक यांनी भाजपाच्या रूपाने कब्जा केल्यानंतर एक अपवाद वगळता काँग्रेसला या मतदारसंघात सूर गवसलाच नाही. कारंजा विधानसभा मतदारसंघ तर दिड तपापासून काँगे्रससाठी मृगजळ ठरले आहे.  

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

रिसोड विधानसभा मतदारसंघ लौकीकदृष्ट्या काँग्रेसच्या खात्यात जमा होत असला तरी झनक घराण्याल वगळून या मतदारसंघात काँग्रेस अस्तित्वहिन असल्याचा इतिहास आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्याकडे जिल्हयाच्या काँग्रेसचे नेतृत्व असतांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये काँग्रेस कायम एक नंबरवर राहिली आहे.

पंचायत समित्या, बाजार समित्या, जिल्हा परिषद, देखरेख संघ हे कायम काँग्रेसचे गड राहिले आहेत. मात्र दिड वर्षापूर्वी माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी काँगे्रसचा त्याग केल्यानंतर जिल्हयातील जनाधार असलेल्या दुसर्‍या फळीतील नेत्यांनी अनंतरावांसोबत जाण्याचे पसंत केल्याने काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली.

सहा महिण्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांमध्ये जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस मागच्या बाकावर फेकल्या गेली. लहान भाऊ म्हणून काँग्रेसची साथ करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषदेच्या राजकारणात अग्रभागी येवून राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पटकाविले. काँगे्रसला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले.

 युवा नेतृत्वाची कुचंबना


जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्षपद गेल्या चार टर्मपासून अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांच्याकडे आहे. पक्ष संघटनेचे नेतृत्व आपल्याकडे ठेवण्यास अ‍ॅड. सरनाईक पक्षश्रेर्ष्ठींना पटवून देण्यास यशस्वी जरी ठरले असतील तरी संघटन पातळीवर पक्षाची पडझड रोखण्यास मात्र अपयशी ठरले आहेत. अनंतराव देशमुख काँग्रेसच्या बाहेर गेल्यानंतर वाशीम, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड व मालेगाव या तालुक्यांमध्ये जनाधार असणारे नेतृत्व काँग्रेसमध्ये कायम ठेवण्या सरनाईक यांचे कौशल्य धराशाही झाले आहे.

आमदार झनकांना संधी मात्र घेणार कधी


  जिल्हयामध्ये सध्या आमदार अमित झनक हे एकमेव काँग्रसेचे आमदार आहेत. अनंतराव देशमुख हे काँग्रेस बाहेर गेल्यानंतर त्यांचे समर्थकही मोठया प्रमाणात बाहेर गेले. या दिड वर्षाच्या कार्यकाळात स्वत:ला काँग्रेसचे जिल्हास्तरीय नेतृत्व म्हणून उभे राहण्याची संधी आमदार अमित झनक यांच्याकडे न मागता चालून आली होती. मात्र आमदार अमित झनक मालेगाव व रिसोड तालुका वगळता जिल्हयात इतरत्र अजूनही पक्ष संघटनेवर प्रभाव पाडू शकले नाही ही वास्तविकता आहे. आमदार झनकांचे युवा नेतृत्व आहे. जिल्हयात काँग्रेस अंतर्गत आता फक्त त्यांचाच गट राहिला आहे. या परिस्थीतीत संधी असतांना ती मिळविणार कधी असा प्रश्न काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. 

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim Congress's mass base suffers, district level leadership void: secondary role in local self-government