'बाहुबली' को रोखनेवाला पैदा नहीं हुआ मामा!

नितीन नायगावकर
मंगळवार, 9 मे 2017

'बाहुबली'ने देशात तर इतिहास रचला आहेच, पण नागपुरात मिळत असलेला प्रतिसाददेखील ऐतिहासिक ठरला आहे. 'बाहुबली'ने पहिल्या आठवड्यात जी कमाई केली आहे, त्याच्या पाव टक्कादेखील इतर ब्लॉकबस्टर सिनेमांना करता आली नव्हती.
- राजा लहेरिया, व्यवस्थापक
पंचशील सिनेमागृह

नागपूर : 'जब तक तुम मेरे साथ हो मुझे मारनेवाला पैदा नहीं हुआ मामा'... बाहुबलीच्या या डायलॉगने जगभरातील चित्रपट रसिकांना भुरळ घातली. पण, आता कमाईची स्थिती बघता 'बाहुबली को रोखनेवाला पैदा नहीं हुआ' असेच म्हणण्याची वेळ आली आहे. पहिल्या आठवड्यात जगभरातून एक हजार कोटींचा गल्ला जमविणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांमध्ये विदर्भातून साडेसहा कोटी रुपयांची 'ऐतिहासिक' कमाई केली आहे. 'बाहुबली' मॅनिया आणखी महिनाभर चालेल, असा अंदाजही व्यक्त होत आहे.

यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 33 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी एखाददुसरा अपवाद सोडला तर इतर चित्रपट कधी आले आणि कधी गेले, याची खबरही कुणाला लागली नाही. चित्रपटगृहांना नुकसानही सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी 'बाहुबली'ची प्रतीक्षा करणाऱ्या चित्रपटगृहांच्या मालकांची अवस्था 'देवसेना'सारखी झाली होती. पण, 'बाहुबली'ने या चार महिन्यांचाच नव्हे, तर गेल्या चार, पाच, सहा दशकांमधील सर्व विक्रम मोडीत काढून इतिहास रचला आहे. पहिल्या दहा दिवसांत साडेसहा कोटी रुपये एकट्या विदर्भातून कमावणाऱ्या 'बाहुबली'ला मागे टाकायचे असेल, तर 'बाहुबली'चाच तिसरा भाग यावा लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नागपुरातील बारा सिनेमागृहांमध्ये पहिल्या आठवड्यात दरदिवशी जवळपास शंभर प्रयोग झाले. मल्टिप्लेक्‍सने सकाळी साडेसातपासून शो सुरू केले, तर काही सिंगल स्क्रीनला सकाळी 9.30 चा अतिरिक्त शो लावण्यात आला. 'ऐसा मौका फिर कहॉं मिलेगा' असा विचार करून थिएटर मालकांनी जेवढा जास्त गल्ला जमवता येईल, तेवढा जमवला.
नागपुरातील सिनेमागृहांच्या इतिहासात 'मुगले आजम', 'शोले' आणि 'जय संतोषी मॉं' हे तीन 'माइलस्टोन' मानले जातात. यात 'बाहुबली'चा समावेश झाला आहे. कमाई आणि गर्दीच्या निकषांमध्ये तर 'बाहुबली' पहिल्या स्थानावर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कथा, जॉनर, काळ, तंत्रज्ञान, ग्लॅमर, स्टारकास्ट, ऍक्‍शन... या सर्व निकषांवर तुलना केली तरी 'बाहुबली'ची बरोबरी करणे अवघड आहे. त्यामुळेच जवळपास 35 वर्षांमध्ये 'जय संतोषी मॉं'नंतर सिनेमागृहांच्या बाहेर ज्या रांगा बघायला मिळाल्या नाहीत, त्या 'बाहुबली'च्या निमित्ताने बघायला मिळाल्या. अर्थात, आज 'ऑनलाइन बुकिंग'ची सोय असल्याने तिकिटांसाठी होणाऱ्या रांगांचा विक्रम 'बाहुबली'ला मोडता आला नाही.

पहिले दहा दिवस (विदर्भातील कमाई)
नागपूर जिल्हा : 3 कोटी 75 लाख रुपये
उर्वरित विदर्भ : 2 कोटी 75 लाख रुपये
-------
एकूण : 6 कोटी 50 लाख रुपये
-------

अकोल्याचा अनोखा विक्रम
गेल्या पाच वर्षांतील ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये सैराट, पीके, दंगल, बजरंगी भाईजान, सुलतान, बाहुबली-1 यांचा समावेश होतो. यापूर्वी अकोला येथे 'सैराट'ने चार महिन्यांत 88 लाख 37 हजार 475 रुपये, 'पीके'ने दोन महिन्यांत 50 लाख 56 हजार 430 रुपये, 'दंगल'ने दीड महिन्यांत 46 लाख 10 हजार 289 रुपये, 'बजरंगी भाईजान'ने दीड महिन्यात 44 लाख 78 हजार 75 रुपये, 'सुलतान'ने दीड महिन्यात 33 लाख 61 हजार 590 रुपये आणि 'बाहुबली-1'ने दोन महिन्यांत 32 लाख 92 हजार 762 रुपये कमाई केली होती. अकोला येथील चार सिनेमागृहांमध्ये 'बाहुबली-2' प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने अवघ्या एकच आठवड्यात 47 लाख 65 हजार 131 रुपयांची कमाई करून अनोखा विक्रम रचला आहे.

Web Title: bahubali mania in vidarbha breaks records