पाक कलावंतांवर बंदी घालून सुटेल का प्रश्‍न? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नागपूर - उरी येथील दहशतवादी हल्ला दुर्दैवी घटना असली तरी दोन-तीन पाकिस्तानी कलावंतांवर बंदी घालून प्रश्‍न सुटणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून टॅलेंटला रोखणे योग्य नसल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज (बुधवार) व्यक्त केले. पाकिस्तानी कलावंतांच्या संदर्भात बॉलीवूडमध्ये दोन मतप्रवाह तयार झाल्याचेही यावरून सिद्ध होते. 

नागपूर - उरी येथील दहशतवादी हल्ला दुर्दैवी घटना असली तरी दोन-तीन पाकिस्तानी कलावंतांवर बंदी घालून प्रश्‍न सुटणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून टॅलेंटला रोखणे योग्य नसल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याने आज (बुधवार) व्यक्त केले. पाकिस्तानी कलावंतांच्या संदर्भात बॉलीवूडमध्ये दोन मतप्रवाह तयार झाल्याचेही यावरून सिद्ध होते. 

दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पाकिस्तानी कलावंतांच्या संदर्भात कठोर भूमिका घेतली होती. अशा परिस्थितीत सोनू सूद याचे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरेल, यात वाद नाही. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आला असताना सोनू बोलत होता. नागपुरात शिक्षण घेऊन बॉलीवूडमध्ये नाव कमावणारा सोनू हा नव्या पिढीतील सर्वांत आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या कारकिर्दीत नागपूरचे योगदान तर आहेच शिवाय "दबंग'सारख्या चित्रपटांमधील पात्रदेखील नागपूरमधील अनुभवावरून साकारल्याचे तो म्हणतो. "दबंग' चित्रपटात छेदी सिंगचे पात्र नागपुरातूनच घेतले होते. मी होस्टेलमध्ये असताना काही बिहारी मित्र माझे रूम पार्टनर होते. त्याच्यातील एकाला कॅमेरा हाती घेऊन सतत "भैय्याजी स्माईल' असे म्हणायची सवय होती. "दबंग'मध्ये मी त्याच मित्राच्या काही सवयी जशाच्या तशा घेतल्या आहेत,' असे तो सांगतो. नागपुरात माझे लग्न झाले. त्यामुळे इथून पळणे शक्‍य नाही. पळायचा प्रयत्न करेन तरी नागपूरकडे ओढला जाईन, अशी मिश्‍किली तो करतो. "तुतक तुतक तुतिया' हा त्याचा आगामी चित्रपट 7 ऑक्‍टोबरला प्रदर्शित होतोय. 

जुन्या टपरीवरचा चहा 
नागपुरात शिकत असतानाच्या खूप आठवणी आहेत. इथे मी लहान गावातून आलो होतो. त्यामुळे नागपूरने दुनियादारी शिकवली. आजसुद्धा सकाळी आल्यावर मी धरमपेठमध्ये माझ्या जुन्या कट्ट्यावर गेलो. त्यानंतर शंकरनगरच्या जुन्या टपरीवर जाऊन चहा प्यायलो, असे सोनू म्हणतो. 

"स्वतःचेच नाव विसरलो' 
बॉलीवूडमध्ये काम करताना आपले मूळ नाव बदलून फिल्मी नाव ठेवण्याची पद्धत आहे. मीदेखील सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोन-तीनवेळा माझे नाव बदलून पाहिले. पण, काहीवेळा लोकांनी मला नाव विचारले तेव्हा मी स्वतःचेच नाव विसरून जायचो आणि शेवटी सोनू सूद असेच सांगायचो. त्यामुळे शेवटी आहे तेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला, असा गमतीदार अनुभव सोनू सांगतो. 

Web Title: ban on Pak artists