Maratha Kranti Morcha : पश्‍चिम विदर्भात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर - पश्‍चिम विदर्भाने कडकडीत बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. तर पूर्व विदर्भातील विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही तुरळक घटना वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या वतीने आज, गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. 

नागपूर - पश्‍चिम विदर्भाने कडकडीत बंद ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. तर पूर्व विदर्भातील विविध संघटनांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही तुरळक घटना वगळता कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाच्या वतीने आज, गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला. 

राज्यव्यापी सकल मराठा समाज अमरावती जिल्ह्यातर्फे तालुक्‍यासह शहराच्या ठिकाणी महत्त्वाच्या चौकांत ठिय्या आंदोलनाने जिल्ह्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला. महामंडळाची एसटी, बाजारपेठ, बाजार समिती, शाळा-महाविद्यालये, खासगी तथा शासकीय कार्यालये बंद होती. बंदमुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बाजारपेठेला बसला. यवतमाळ जिल्ह्यात आंदोलनाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. दारव्हा येथे मराठा, कुणबी आणि मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तर पुसद येथील शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. तर वाशीम आणि अकोला शहरात दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्यात. शाळा-महाविद्यालये बंद होती. तिन्ही जिल्ह्यात बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. सकल मराठा समाजातर्फे अकोला शहरातून सकाळी रॅली काढून बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. विद्यानगर परिसरात एक शोरूम बंददरम्यान उघडे असल्याने आंदोलकांकडून दगडफेक झाली.  

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आली. अनेक संस्थांनी शाळांना सुटी दिली. तर व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. भंडारा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. वर्धा येथील बससेवा पूर्णतः बंद होती. येथील शिवाजी चौकात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सामाजिक ऐक्‍याचे दर्शन
यवतमाळ येथे मराठा आरक्षण आंदोनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यासोबतच सामाजिक ऐक्‍याचे दर्शनही घडले. आरक्षणासाठी मराठा, कुणबी, धनगर आणि मुस्लिम बांधवांचा एकत्र मोर्चा काढण्यात आला.  नागपूर-बोरी-तुळजापूर मार्ग आंदोलकांनी मार्लेगाव येथे सकाळपासून रोखून धरला. परिणामी, अनेक प्रवासी त्याठिकाणी अडकले होते. या प्रवाशांना मराठा समाजाकडून जेवण दिले गेले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर जेवणाची पंगत पाहायला मिळाली.

Web Title: Maratha Kranti Morcha West Vidarbha bandh