#MarathaKrantiMorcha आरक्षणासाठी गोंदिया, वर्धेत मराठा क्रांती मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

नागपूर - मराठा समाजाला १६ टक्‍के आरक्षण लागू करण्यात यावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नागपूर - मराठा समाजाला १६ टक्‍के आरक्षण लागू करण्यात यावे, याकरिता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आला. या वेळी शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट (जि. वर्धा) - मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. ३०) क्रांती मोर्चा काढण्यात आला. युवती, महिला, युवकांच्या मोठ्या सहभागात मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत मोर्चा तहसील कार्यालय परिसरात धडकला. उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांना निवेदन सादर करण्यात आले. प्रारंभी, मराठा आंदोलनादरम्यान मृत्यूला कवटाळणाऱ्या काकासाहेब शिंदे व श्री. सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

गोंदिया - मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता येथील पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले. दुपारी २ वाजता मोटारसायकल रॅली काढून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. जिल्ह्यातील ७० टक्‍के मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते पाल्यांना उच्च शिक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने त्वरित आरक्षण द्यावे, अशी मागणी करीत समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

नगरसेवक भोयर यांचा राजीनामा                    
नेर (जि. यवतमाळ) - मराठा समाज व मुस्लिम धनगर समाजाला आरक्षण शासनाने त्वरित द्यावे, या मागणीच्या समर्थनार्थ नेर नगरपंचायतचे नगरसेवक मोहन भोयर यांनी सोमवारी (ता.३०) नगरसेवकपदाचा राजीनामा नगराध्यक्षांकडे सादर केला. वृत्त लिहीपर्यंत तो  स्वीकारण्यात आला नव्हता. या पूर्वीच खासदार असताना संसदेमध्ये रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठविला होता. तसेच एस. सी., एस. टी. व ओबीसी यांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण मिळावे, अशी आर.पी.आय. ची भूमिका असल्याचे भोयर यावेळी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation