पदवी प्रवेशाची प्रक्रिया शनिवारपासून, १२ पर्यंत करता येईल अर्ज

मंगेश गोमासे
Wednesday, 2 December 2020

नागपूर विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक विषयांचे निकाल लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी ५ डिसेंबरपासून विद्यापीठात ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया शनिवार (ता.५) पासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना ५ ते १२ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. यंदा पदवी परीक्षेच्या निकालात सुमारे ५० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविली गेली आहे. यामुळे काही विषयांमध्ये प्रवेशासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

नागपूर विद्यापीठाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या. आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक विषयांचे निकाल लागले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी ५ डिसेंबरपासून विद्यापीठात ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

उपाशी आदिवासींसाठी लाहेरी पोलिस आले धावून; लांब अंतरावरून आलेल्या नागरिकांसाठी केली जेवणाची सोय

दोन टप्प्यात प्रवेश पूर्ण होतील. विद्यापीठाच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागांसह संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश होतील. विद्यापीठ स्तरावर दोन टप्प्यातील प्रवेश पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जागांवर महाविद्यालय स्तरावर प्रवेश होतील. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५ ते १२ डिसेंबरपर्यंत www.rtmnu.university या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. 

१६ सप्टेंबरला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर १८ डिसेंबरपर्यंत त्यावर आक्षेप नोंदविता येऊ शकेल. २० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होईल. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २१ आणि २२ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात महाविद्यालयाची निवड करता येईल. 

२६ ते ३० डिसेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ३० डिसेंबरला रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल व ३० डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान दुसऱ्या टप्प्यासाठी पर्यायी अर्ज भरावा लागणार आहे. यानंतर ३ जानेवारीला प्रवेश निश्चित होतील व ४ ते ८ जानेवारीदरम्यान महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. १४ जानेवारीपासून नियमित वर्ग सुरू करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे. 

संपादन : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  admission process of Nagpur University from Saturday