नागपुरात भर पावसाळ्यात अतिक्रमण पाडले; महापालिकेविरुद्ध रोष   

राजेश प्रायकर
Monday, 10 August 2020

बहुतांश अतिक्रमितांनी नोटिशीची दखल न घेतल्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व झोन आयुक्तांना दिले. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

नागपूर : नदी-नाल्यांच्या भिंतीवर घरांचे खांब उभारून किंवा नाल्यांमध्ये पिलर टाकून पाण्याचा प्रवाह अडविणाऱ्या अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. मात्र, ऐन पावसात घरे पाडल्याने महापालिकेविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. 

शहरातील नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदी या तीन मुख्य नद्यांसह वस्त्यांमधील मोठ्या नाल्यांवर, नाल्यांच्या भिंतीवर अथवा नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पक्की घरे बांधण्यात आली आहेत. चक्क नदी-नाल्यांमध्ये स्तंभ टाकून पाण्याचा प्रवाह अडविण्यात किंवा वळविण्यात आला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसद्वारे अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, बहुतांश अतिक्रमितांनी नोटिशीची दखल न घेतल्याने अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व झोन आयुक्तांना दिले. त्यानुसार अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

लकडगंज झोनअंतर्गत आदर्शनगर झोपडपट्टीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नाल्यावर अतिक्रमण केले आहे. दोन ते तीन मजली इमारती बांधल्या आहेत. अशा चार इमारतींना मनपाच्या अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त केले. या झोपडपट्टीतील काहींना पट्टे प्राप्त आहेत. मात्र, बांधकाम करताना मनपाची परवानगी घेतली नाही. अशा चार घरांवर कारवाई सुरू आहे. सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या चांभार नाल्यावरील तीन बांधकामेही पाडण्यात आली. 

 
सिव्हर लाइनवरील अतिक्रमण काढणार 
शहरातील पाइपलाइनवर आणि सिव्हर लाइनवरही अनेकांनी अतिक्रमण केल्याने दुरुस्तीकार्यात अडथळा निर्माण होत आहे. शिवाय पाइपलाइनला गळती लागून दूषित पाणीपुरवठा होतो. आशीनगर झोनअंतर्गत पवननगर, संगमनगर, मेहबूबपुरा, हबीबनगर आणि प्रभाग क्र. ३ मधील एलआयजी कॉलनीसह अन्य भागांमध्ये दूषित पाण्याच्या अनेक तक्रारी आहेत. पाइपलाइनवरील बांधकाम तातडीने तोडून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले. 

 
कुणालाही बेघर करणे हा मनपाचा उद्देश नाही. मात्र, नियमांच्या विरुद्ध जाऊन चक्क नाल्यावरच घर बांधणे आणि पावसाळ्यात इतरांच्या मालमत्तेचे नुकसान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढावी; अन्यथा महापालिकेकडून अतिक्रमण काढण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण खर्च घरमालकाकडून आकारण्यात येईल. शिवाय गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येतील. 
-तुकाराम मुंढे, आयुक्त. 

 
नाल्याच्या बाजूला घरे असलेल्या नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शविली असताना महापालिकेने आदर्शनगरातील घरे पाडली. या घटनेबाबत महापालिकेचा निषेध आहे. येथील नागरिकांचे पुनर्वसन करावे. त्यानंतर कारवाई करावी. ऐन पावसात तसेच कोरोनाच्या काळात नागरिक कुठे जाणार? 
-ॲड. यशवंत मेश्राम, समन्वयक, प्रदेश काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग. 

(संपादन : मेघराज मेश्राम)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Anger against Municipal Morporation for demolishing houses