कोरोनामुळे महागला सावजी ठसका, ही आहेत कारणे...

सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 2 June 2020

लॉकडाउनपूर्वीच्या मसाल्यांच्या किमती व सध्याच्या किमतीमध्ये तब्बल 15 ते 20 टक्‍क्‍यांचा फरक आहे. हिंग, तेजपान, जायफळ वगळता सर्वच मसाल्यांच्या किमती वाढल्या आहेत.

नागपूर : कोरोनामुळे खासगी नोकदारांना नोकरीची चिंता तर व्यावसायिकांना व्यवहार सुरळीत होण्याची चिंता सतावत आहे. महिलावर्गासह शहरातील सावजी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. बाजारात खडा मसाल्यांच्या किमतीत 15 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याने विदर्भातील सावजी ठसकाही महागणार आहे.

लॉकडाउनपूर्वीच्या मसाल्यांच्या किमती व सध्याच्या किमतीमध्ये तब्बल 15 ते 20 टक्‍क्‍यांचा फरक आहे. हिंग, तेजपान, जायफळ वगळता सर्वच मसाल्यांच्या किमती वाढल्या आहेत. राज्यात दक्षिणेतील केरळ, कर्नाटक, काही प्रमाणात तमिळनाडूमधून मसाल्यांचा पुरवठा होतो. लॉकडाउन लागल्यानंतर काही दिवस वाहतूक बंद असल्याने मसाल्यांचा पुरवठा अत्यंत कमी झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान खसखस, हिंग, तेजपान, जायफळ, वेलदोडे, लवंग यांच्या किमतीत मात्र वाढ झाली नसल्याने गृहिणींना दिलासा आहे. यात वेलदोड्याचे दर पूर्वी 4 हजार रुपये प्रतिकिलो होते ते आता 3500 रुपये झाले आहेत.

वाहतूक बंदीचा फटका
लॉकडाऊनमध्ये काही दिवस वाहतूक बंद असल्याने मसाल्यांचा तुटवडा शहरात जाणवला. या कालावधीत मसाल्याचे दरदेखील वाढले असून, वाहतूक सुरू झाल्यानंतर काही दर कमी झाले. मात्र, अनेक मसाल्यांचे दर अजूनही वाढलेले आहे.
रामकृष्ण मयंकर, किराणा विक्रेते

 

असे आहेत मसाल्याचे दर (किलोप्रमाणे)    
मसाल्याचा प्रकार लॉकडाऊनपूर्वीचे दर आताचे दर
मिरे 400 ते 1 हजार 500 ते 1200
हळद 130 ते 140 160 ते 170
बडीशोप 100 ते 200 120 ते 250
जिरे 160 ते 170 200 ते 220
दालचिनी 450 ते 460 600 ते 700
दगडफुल 400 ते 420 550 ते 600
त्रिफळा 200 ते 220 250 ते 260
बाजा 500 ते 520 750 ते 800
शहाजिरे 500 ते 510 530 ते 700
रामपत्री 800 ते 850 1250 ते 1300
जावंत्री 1900 ते 1930 2600 ते 2650
सुंठ 440 ते 450 550 ते 560