‘गिनेस बुक’ विजेते सुनील वाघमारे यांचे १५० दिवस गायन; युनिक वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

केतन पळसकर
Monday, 22 February 2021

सुनील यांनी २५ सप्टेंबर २०२० रोजी दररोज दुपारी १ ते ३ या कालावधीत फेसबुक लाइव्हवर गायन सुरू केले. त्याला रविवारी (ता. २१) १५० दिवस पूर्ण झाले. गुजरातमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर रोज एक तासप्रमाणे १०० दिवस गायनाचा विक्रम रचला होता.

नागपूर : गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेते गायक सुनील वाघमारे यांनी आणखी एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. सलग १५० दिवस दररोज दोन तास ‘फेसबुक लाइव्ह’वर गायन करून त्यांनी युनिक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. मात्र, आणखी काही दिवस गायन करून अनोखा विक्रम रचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महाल येथील संघ मुख्यालयाच्या परिसरातील कार्यालयात १५० दिवस गायनाची नोंद झाल्यानंतर डॉ. दंदे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे व सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सतिजा यांच्या हस्ते सुनीलकुमार यांचा गौरव करण्यात आला. नऊ वर्षांपूर्वी सलग १०५ तास गायन करून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करणारे सुनील वाघमारे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

सुनील यांनी २५ सप्टेंबर २०२० रोजी दररोज दुपारी १ ते ३ या कालावधीत फेसबुक लाइव्हवर गायन सुरू केले. त्याला रविवारी (ता. २१) १५० दिवस पूर्ण झाले. गुजरातमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर रोज एक तासप्रमाणे १०० दिवस गायनाचा विक्रम रचला होता. हा विक्रम मोडणे सुनील यांना फार अवघड गेले नाही.

२५ पार्श्वगायकांनी गायलेली व ५१ अभिनेत्यांवर चित्रीत गाणी ते दररोज दोन तास गातात. या विक्रमासाठी वाघमारे यांना विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, मुधोजी राजे भोसले, महाराष्ट्र मातंग एकीकरण समिती, प्रा. डॉ. अशोक कांबळे, सुधीर घिके, मनपाचे उपविभागीय अभियंता सुनील गजभिये आदींची साथ मिळाली.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

गायन माझ्यासाठी पॅशन
गायन हे माझ्यासाठी पॅशन आहे. मला ‘युनिक वर्ल्ड रेकॉर्ड’ची कल्पना सुचली. १५० दिवस गायन करू शकलो याचा आनंद आहे.
- सुनील वाघमारे,
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेता गायक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 days of singing by Sunil Waghmare Unique world record set