बीएलओचे काम नाकारले ना ! शिक्षकांनो भोगा फौजदारीची फळं

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जवळपास 213 शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्या "अपडेट' करण्याचे काम बीएलओमार्फत करण्यात यावे, असे आदेश जारी करण्यात आले होते.

हिंगणा (जि.नागपूर)  :  मतदारयाद्या "अपडेट' करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती केली. निवडणुकीच्या कामात हयगय केल्याप्रकरणी शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार तहसील प्रशासनाने बुधवारी (ता.5)पोलिसांत दाखल केली.

क्‍लिक करा  :  अखेरची ठरली वाढदिवसाची पार्टी, आजी बोलवायला गेली पण...

 

बीएलओचे काम नाकरण्याचे कारण
तालुक्‍यातील जवळपास 213 शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
निवडणूक आयोग नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयाद्या "अपडेट' करण्याचे काम बीएलओमार्फत करण्यात यावे, असे आदेश जारी करण्यात आले होते. यानुसार तहसीलदार संतोष खांडरे यांनी "हॅलो' म्हणून तालुक्‍यातील 233 शिक्षकांची नियुक्ती केली. यासाठी काही महिन्यांपूर्वी तहसीलमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हे काम करण्यास शिक्षकांनी विरोध दर्शवून प्रशिक्षणाला गैरहजेरी लावली होती. यानंतर शिक्षकांनी बीएलओचे काम करणार नाही, असे तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते.

क्‍लिक करा  :  तिकडे पिडीतेचा संघर्ष सुरू आहे अन्‌ या दोन महिला नेत्या आपसात भिडल्या

निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा
राज्य निवडणूक आयोगाकडून बीएलओच्या कामाचा आढावा घेणे सुरू आहे. हिंगणा तालुक्‍यात केवळ 15 ते 20 शिक्षकांनी बीएलओचे काम सुरू केले आहे. बीएलओंना मतदारयादीत नाव दुरुस्ती करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदारांचे व्हेरिफिकेशन करणे, मतदारांच्या घरी भेटी देणे यासह इतर कामांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने बीएलओच्या कामाचा आढावा तहसील प्रशासनाला मागितला आहे. बीएलओची कामे थंडबस्त्यात असल्याने निवडणूक आयोगाला काय माहिती द्यावी, असा प्रश्न तहसील प्रशासनाला पडला आहे.

क्‍लिक करा  :  मनपा थकबाकीदारांना आता तुरूंगाची वारी

गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
तहसीलदार संतोष खांडरे यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार मेश्राम यांनी 5 फेब्रुवारी रोजी बीएलओचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 चे कलम 32 व भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 187 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पोलिसात करण्यात आली. ही कारवाई जवळपास 213 शिक्षकांवर होऊ शकते. पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिस प्रशासन आता शिक्षकांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 213 The burden of action on teachers