चिमुकल्या पिलांना दिले घरटे; ५०० बालक स्वगृही 

file photo
file photo

नागपूर : काही कारणांमुळे स्वजणांपासून दुरावलेल्या आणि रेल्वे स्थानकावर वावरणाऱ्या बालकांना स्वगृही पोहोचविणे किंवा त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याचा रेल्वे सुरक्षा दलाचा नेहमीच प्रयत्न असतो. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात ५०० बालकांना स्वकीयांपर्यंत पोहोचवून देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. 

दपूमरेच्या रेल्‍वे सुरक्षा दलाने अनेक उल्लेखनीय कार्यांद्वारे आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली आहे. चाईल्ड लाइनच्या मदतीने ५०० बेघर बालकांची पुन्हा कुटुंबीयांशी गाठभेट घालून दिली. बरेचदा प्रवासी घाईत सामान रेल्वेतच विसरतात असे सुमारे ६ लाख रुपये किमतीचे साहित्य प्रवाशांना परत मिळवून दिले. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा अनधिकृत ताबा मिळविण्याचा २५८ प्रकरणांमध्ये ४१७ आरोपींना जेरबंद करून साडेतीन कोटींची मालमत्ता जप्त करण्‍यात आली.

महिलांसाठीच्या आरक्षित डब्यात बसणाऱ्या ५ हजार ७३२ पुरुषांवर कारवाई करीत साडेआठ लाखांचा दंड तर आणि दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यात बसणाऱ्या सुमारे २ हजार प्रवाशांकडून तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेडब्यात अनधिकृतपणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ५ हजार २३४ अवैध वेंडर्सविरूद्ध कारवाई करीत ३२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. याच काळात ट्विटरद्दारे मांडण्यात आलेल्या ३६९ तक्रारी आणि १८२ या हेल्पलाईन क्रमांकावरून आलेल्या ६६० तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात आले.

कोणत्याही कारणाशिवाय चेन पुलिंग करून गाडी थांबविण्यासह अन्य प्रवाशांना विनाकारण वेठीस धरणाऱ्या १ हजार ८२१ जणांवर कारवाई करीत सव्वासहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला. लॉकडाउनच्या काळात दपूमरेमधून ३५३ श्रमिक स्पेशल ट्रेन चालविण्यात आल्या, या गाड्या आणि श्रमिकांच्या सुरक्षेची काळजी घेत त्यांच्याकडून डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करवून घेण्यात आहे. रेल्वे ट्रॅकवरून चालत जाणाऱ्या ३०७ प्रवाशांना प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. सुमारे ८० हजार प्रवाशांना जेवण उपलब्ध करून देण्यात आले. 

१८२ गुन्हेगारांना अटक 
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ हजार ३१ दोषींवर रेल्वे अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली. १८२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अति महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर एकिकृत सुरक्षाप्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून महत्त्वाच्या १९ स्थानकांवर निर्भया फंड अंतर्गत सीसीटिव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. स्टेशन सुरक्षा योजनेतून ८ स्थानकांवर सुरक्षाविषयक कामे सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com