घोळातघोळ आणि गोंधळात गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जानेवारी 2020

हजार शेतकऱ्यांना अद्याप पहिल्या टप्प्यातीलच निधी मिळाला नाही. शेतकरी सन्मान योजनेसाठी आधार क्रमांकच आवश्‍यक करण्यात आला आहे. आधार क्रमांकामुळे घोळ निर्माण झाला असून अनेक जण लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. "सन्मान'च्या लाभात आधार "काळ'च ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

नीलेश डोये
नागपूर : योजना खूप चांगल्या असल्या तरी त्या राबविणारी यंत्रणा जर कुचकामी असेल तर पदरी काहीच पडत नाही. भारतीय नागरिकत्वाचा प्रमुख दाखला असलेले आधार कार्डच शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा लाभ मिळण्यातली प्रमुख अडचण ठरत आहे. आधार क्रमांक दिल्याशिवाय शेतकरी सन्मान योजनेची रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकत नसल्यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका क्‍लिकवर कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात "सन्मान' योजनेची रक्कम वळती केली. तर दुसरीकडे हजार शेतकऱ्यांना अद्याप पहिल्या टप्प्यातीलच निधी मिळाला नाही. शेतकरी सन्मान योजनेसाठी आधार क्रमांकच आवश्‍यक करण्यात आला आहे. आधार क्रमांकामुळे घोळ निर्माण झाला असून अनेक जण लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. "सन्मान'च्या लाभात आधार "काळ'च ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा - जिद्द असावी तर अशी, विजेचा दिवा अन्‌ ती

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. चार महिन्यांनंतर साधारणत: दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात येतात. आतापर्यंत तीन टप्प्यातील रक्‍कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आली. शेतकऱ्यांकडून अर्जासोबत पॅन कार्ड आणि आधार क्रमांक व सरकारने आधार लिंक असलेले बॅंक खाते घेण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले. पहिल्या टप्प्यात 94 हजार 849 तर, दुसऱ्या टप्प्यात 91 हजार 644 तर तिसऱ्या टप्प्यात 38 हजार 981 शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांची रक्कम वळती करण्यात आली आहे. एकीकडे तीन टप्प्यातील रक्कम वळती करण्यात आली असताना दुसरीकडे अद्याप 45 हजार शेतकऱ्यांना एकाही टप्प्यातील रक्कम मिळाली नाही.

एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आधार क्रमांकाच्या घोळामुळे अनेक जणांना सन्मानाची रक्कम मिळाली नाही. आधार क्रमांक लिहिण्यात चुका झाल्याने एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात वळते होत असल्याचे यंत्रणेच्या निदर्शनात आल्याची माहिती आहे. अनेकांचे खाती "होल्ड'वर ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्रुटींची माहिती अर्जदार शेतकऱ्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येते.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aadhar card is essencial for sanman yojana