'नेत्र'दीपक यशासह गुणवत्तेची 'आरती'

Aarti Shines in HSC
Aarti Shines in HSC

नागपूर : अवघ्या चार वर्षांची असतानाच तिचे आई-वडील रस्ते अपघातात कायमचे निघून गेले. सगळेच पोरके आणि सगळंच शून्य असताना मामा आधाराला आला. त्याच्या आधाराने आधी दहावी आणि आता बारावीत "नेत्र'दीपक यश मिळवीत दिव्यांगातून प्रथम येण्याचा मान आरती मानमोडेने पटकाविला आहे. तिला 90.60 टक्के मिळाले आहे.

आरतीच्या दोन्ही डोळ्यांत जन्मत: मोतीयाबिंदू झालेत. दोन महिन्यांची झाल्यावर तिला केवळ आवाज ऐकू येत असल्याचे समजले. त्यामुळे वयाच्या तिसऱ्या महिन्यांतच पहिले, तर सहाव्या महिन्यांत दुसरे ऑपरेशन झाले. आई सीमा व वडील विलास मानमोडे यांनी तिला नजर मिळावी म्हणून डॉक्‍टरांच्या अनेक खेटा घातल्या. त्याच खेट्यात एकेदिवशी आरती व तिच्या लहान भावाला घरी ठेवून ते डॉक्‍टरकडे गेले. याचवेळी काळाने घाला घातल्याने अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. अवघ्या चार वर्षांच्या आरतीला कोण सांभाळणार, असा प्रश्न निर्माण झाला. पवनार, वर्धा येथे राहणारा मामा जगदीश चोपडे यांनी तिची जबाबदारी तर, लहान भावाची जबाबदारी मोठ्या वडिलांनी स्वीकारली.

मामाने पवनार सोडले व नागपुरात खासगी नोकरी पत्करली. तिचे सगळे लाड पुरविताना तिला श्रद्धानंदपेठेतील कुर्वेज न्यू मॉडेल शाळेत टाकले. अभ्यासात तिची चिकाटी बघता, शिक्षकांनीही तिला प्रोत्साहन देण्यास सुरू ठेवले. मित्र-मैत्रिणींनीही तिला सहकार्य करण्यास सुरुवात केली आणि दहावीच्या परीक्षेत तिने 90.60 टक्के गुण मिळवून दिव्यांगामध्ये महाराष्ट्रातून अव्वल येण्याचा मान पटकावला. यानंतर हिस्लॉप महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेत आरतीने बारावीतही नेत्रदीपक यश मिळविले आहे. निकालात 90.60 टक्के गुण मिळवीत तिने दिव्यांगांमधून प्रथम स्थान प्राप्त केले आहे.

आयएएस होण्याचे स्वप्न


दिव्यांग म्हटले की, कुणीही केवळ सहानुभूतिपूर्वक बघितले जाते. मात्र, दिव्यांगामध्ये बरीच क्षमता असून, त्या क्षमतेचा उपयोग करूनच "आयएएस' होऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचा मानस आरतीने बोलून दाखविला. यासाठी परिश्रम घेण्याची पूर्ण तयारी आहे, असे आरती मानमोडे म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com