मुजोर भूखंडधारकांना घडविणार अद्दल

About to create peacock landholders
About to create peacock landholders

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मोकळ्या भूखंडावर कचरा साचल्यास कारवाईचे कुठलेही धोरण नसल्याने मुजोर झालेल्या भूखंडधारकांना अद्दल घडविणाऱ्या नियमावलीवर आज महापालिका सभागृहाने शिक्कामोर्तब केले. महापौर संदीप जोशी यांनी दोनदा दंडात्मक कारवाईनंतरही भूखंड स्वच्छ न झाल्यास जप्तीच्या कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले.

सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे दयाशंकर तिवारी यांनी मोकळ्या भूखंडांवर कारवाईसंदर्भातील फाईल आयुक्तांच्या स्वीय सहायकांनी परत पाठविल्याने नाराजी व्यक्त केली. मोकळ्या भूखंडांवर कारवाईतून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहणार आहेच, शिवाय यातून महापालिकेला उत्पन्नही मिळणार आहे. स्थायी समितीने यासंदर्भातील प्रस्ताव सभागृहाकडे पाठविला. मात्र, सभागृहात का आला नाही? असा सवाल करीत तिवारी यांनी प्रशासन गांभीर्य नसल्याचा आरोप केला. 3 फेब्रुवारीला आयुक्तांकडे फाईल गेली. 12 फेब्रुवारीपर्यंत फाईल प्रलंबित होती. यावर आयुक्तांनी रूजू झाल्यापासून अनेक फाईल्स बघत असून अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असल्याचे सांगितले. तिवारी यांनी ही फाईल सभागृहात मान्यतेसाठी आल्याचे समजून मोकळ्या भूखंडासंदर्भातील धोरणाला मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानुसार महापौर जोशी यांनी कचरा असलेल्या मोकळ्या भूखंडधारकांना नोटीस देण्याचे निर्देश दिले. नोटीसनंतर दोन दिवसांत कचरा न उचलल्या, भूखंड स्वच्छ न केल्यास 50 रुपये प्रति चौरस फूट दंड आकारण्याचे, त्यानंतरही कचरा न उचलल्यास 100 रुपये प्रति चौरस फूट दंड आकारण्याचे, त्यानंतरही स्वच्छता न दिसल्यास भूखंड जप्त करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

बाजारासंदर्भात संघटनांसोबत आठ दिवसांत बैठक

प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी बाजारांवरील कारवाईवरून प्रश्‍नोत्तराच्या तासात केंद्र सरकारच्या कायद्याचे पालन करावे, अशी मागणी केली. प्रशासनातर्फे विधी तज्ज्ञ , वाहतूक पोलिस, सहायक आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे उपायुक्त राजेश मोहिते यांनी सांगितले. महापौरांनी यासंदर्भात निर्देश देताना गरीबांविरोधात नसल्याचे स्पष्ट केले. शासन निर्णय, न्यायालयाचे आदेश आदीचा अभ्यास करून येत्या आठ दिवसांत यासंदर्भात निवेदन देणाऱ्या संघटनांसोबत बैठक घ्यावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

सिमेंट रस्त्यांच्या जाडीवरून चौकशीचे निर्देश

शहरातील सिमेंट रस्ते निकषानुसार होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण व महापालिकेच्या सिमेंट रस्त्यांच्या जाडीत तफावत असल्याचे वास्तव सतीश होले यांनी मांडले. महापालिकेकडे जास्त पैसा आहे का? असा सवाल त्यांनी केला. केवळ नगरसेवकांच्या मागणीवरून सिमेंट रस्ते केली जात आहे. शहरातील सिमेंट रस्ते तयार करण्यापूर्वी रस्त्याची तपासणी केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला. महापौर संदीप जोशी यांनी याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यांनी चौकशी करावी, असे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com