ब्रेकिंग नागपूर जिल्हा : दुचाकीवर "लिप्ट' देऊन रस्त्यात केली आरोग्यसेविकाला मारहाण, मागीतले पैसे, पुढे घडले विचित्र...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

"ती' एक सर्वसामान्य आरोग्यसेविका. रोजच्या कर्तव्यानुसार ती तालुक्‍याच्या गावावरून जवळच्याच एका गावी कामानिमित्त जात होती. वेळ दुपारची, रस्ता निर्मनुष्य, रखरखीत उन्ह, कुणी सोबतीला नाही. रस्त्यावर चिटपाखरूही आढळत नाही. अशावेळी एक दुचाकीस्वार त्या रस्त्यावरून जात असल्याचे पाहून तिच्या जिवात जीव आला. दुचाकीस्वार तिच्याजवळ येताच त्यानेच तिला "लिप्ट' देऊ केली. तीही मुकाट्याने त्याच्या दुचाकीवर बसली... आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर घडले भलतेच...

पारशिवनी (जि. नागपूर) : पारशिवनी येथील रहिवासी 48 वर्षीय महिला ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नागलवाडी येथील उपकेंद्रात आरोग्यसेविकापदावर कार्यरत असून, मुख्यालयी बडेगाव येथील आरोग्यकेंद्रात काही शासकीय कामासाठी नागलवाडी येथून साधन नसल्याने सिरोजी गावापर्यंत "लिफ्ट' घेऊन आली. सिरोजी येथे वाहनांची वाट पाहत असताना अचानक एका दुचाकीचालकाने आरोग्यसेविकेला मी पण बडेगावमार्गे जात असल्याचे सांगून दुचाकीवर बसायला सांगितले. आरोग्यसेविका ही मदत मिळत असल्याने त्या वाहनावर बसली.

अधिक वाचा : आयुक्‍त मुंढेंची बदली रोकण्यासाठी नागपुरकरांनी लढविली ही शक्‍कल

आरोग्यसेविकेला दिले गुंगीचे औषध
रस्त्यात मध्येच दुचाकीचालकाने मित्रांना भ्रमणध्नीवरून फोन करून बोलावून घेतले. काही दूरपर्यंत रस्त्यातच सेविकेला "तो' दुचाकीचालक मद्यप्राशन करून असल्याचा संशय आला. ती घाबरली. पाणी पिण्याचा बहाना करून तिने दुचाकीवरून उतरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुचाकीचालकाने स्वतःजवळचे पाणी तिला प्यायला दिले. काही वेळातच सेविकेला गुंगी येत असल्याने तिने वाहन थांबविण्याची विनंती केली. परंतु, तिला तोंडावर गालावर, डोळ्यांवर लाता बुक्‍क्‍यांनी जबर मारहान करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. त्यावेळी तिचा कृत्रिम डोळा निघून बाहेर पडला. आधीच एका डोळ्याने आंधळी आरोग्यसेविका कशीबशी स्वतःला सावरू लागली. दुसऱ्याही डोळ्यांवर या मारेकऱ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याही डोळ्याला गंभीर इजा झाली.

अधिक वाचा : अरे देवा...टाळेबंदीतही 25 लाख लोक करणार जेलभरो आंदोलन, काय आहे प्रकार?

आरोपींनी पळ काढला
आरोग्यसेविका घटनास्थळी बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून आरोपींनी पळ काढला. कुणीतरी खापा पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली. लागलीच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोग्यसेविकेला त्यांनी खापा येथील आरोग्यकेंद्रात उपचारासाठी आणले. डॉक्‍टरांनी तिला गंभीर मारहाण झाल्याने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ती शुद्धीवर आली तेव्हा तिने आपबीती कथन केली.

हेही वाचा : बॅंकवाले म्हणाले, स्वॉरी ! तो मॅसेज जुना होता !कर्ज देणार नाही, कारण काय तर हे.

हा मार्ग महिलांसाठी धोकादायक
ड्यूटीवर कार्यरत असताना या मार्गावर काही दुचाकीचालक लुटमारीच्या शोधात असल्याने अशा घटना नेहमीच घडत असल्याचे बोलले जाते. रस्ता निर्मनुष्य असल्याने या मार्गावरील महिलांना लुटणे, विनयभंग करणे, जीवे मारण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्याने या मार्गावरून महिलांना प्रवास करणे अतिशय धोकादायक झाले आहे. त्या आरोग्यसेविकेला "लिप्ट' देऊन मारहाण केली. पण, त्यात त्या दुचाकीचालकाचा काय हेतू होता? त्याने तिला कशासाठी मारले? मारहाण केल्यामुळे त्याचा कुठला हेतू साध्य झाला? अशा लांबलचक प्रश्‍नांची मालिका पुढे उभी राहते. या प्रश्‍नांची कोंडी पोलिसांच्या तपासांतून सुटू शकते. खापा पोलिसांना या आरोपींचा शोध लावण्यात कितपत यश प्राप्त होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse of healthcare by giving "lift", followed by severe beating,