अडीच हजार दे, घरखरेदीसाठी अडकलेले पैसे मिळवून देतो...

bribe
bribe

नागपूर : वनरक्षकाकडून अडीच हजारांची लाच घेणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचून अटक केली. महेश शिंदे (56) असे अटकेतील लाचखोर वनपालाचे नाव आहे. तो नागलवाडी येथील वन्यजीव विभागात वनपाल पदावर कार्यरत आहे. 

या प्रकरणातील तक्रारदार सुरेवाणी येथील कार्यालयात वनरक्षक पदावर कार्यरत आहे. नागलवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी हे कार्यालय पेंच व्याघ्रप्रकल्प कार्यालयांतर्गत येते. तक्रारदार वनरक्षक यांनी जानेवारी 2017 मध्ये उप वनसंरक्षक कार्यालयात घर खरेदीसाठी अग्रीम मिळावे यासाठी अर्ज केला होता. 2019 मध्ये अर्ज मंजूर झाला. घरखरेदीसाठी 15 लाख रुपये मंजूर झाले असून रक्कम प्रथम अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या खात्यावर जमा झाली असल्याचे पत्राद्वारे त्यांना कळविण्यात आले.

वनपाल एसीबीच्या जाळ्यात 
प्रक्रियेनुसार ही रक्कम नागलवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कदम यांच्या कार्यालयीन खात्यावर जानेवारी 2020 मध्ये जमा झाली. कार्यालयीन तांत्रिक अडचणीमुळे अग्रिम रक्कम अप्पर प्रधान वनसंरक्षकांच्या खात्यावर परत गेली. महेश शिंदे यांनी तक्रारदारासोबत संपर्क साधून परत गेलेली रक्कम परत मिळवून देण्याची तयारी दर्शविली. या कामासाठी अडीच हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली. पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी तक्रारीची शहानिशा केली. शुक्रवारी पारशिवणी परिसरात सापळा रचण्यात आला. शिंदेने अडीच हजारांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी शिंदेविरुद्ध पारशिवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. शिंदेच्या घराची झडाझडती घेण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com