तक्रार करायची, पण आर्थिक परिस्थिती नाही? मग करा फोन

अनिल कांबळे
रविवार, 26 जानेवारी 2020

काहींनी एसीबीची माहिती काढल्यास तक्रार नोंदविण्यासाठी नागपुरात स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून येणे शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत एसीबीने पुढाकार घेतला असून चक्‍क "फोन करा तक्रार नोंदवा' अशी संकल्पना आणली आहे. फोनवरून तक्रार नोंदविल्यास त्याची शहानिशा केल्यानंतर लाच मागितल्याचे सापळे रचणे शक्‍य होणार आहे.

नागपूर : शासकीय विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसतो. अनेकांना लाचलुचपत विभागाबाबत माहिती नसल्याने तक्रार देण्यास टाळाटाळ होते. मात्र, त्यावर उपाय म्हणून आता चक्‍क एसीबीनेच सकारात्मक पाऊल उचलून पुढाकार घेतला आहे. एसीबीला फोनवरून माहिती दिल्यास थेट तक्रारदाराच्या दारात अधिकारी जाऊन तक्रार नोंदविण्यासाठी मदत करणार आहेत.

phone call indian police साठी इमेज परिणाम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "शासकीय काम आणि सहा महिने थांब' अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात दलालांचे साम्राज्य वाढत आहे. तसेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा लाच घेतल्याशिवाय फाइलला हात लावत नाही. सामान्य नागरिकाला शासकीय कार्यालयात लाच मागितल्यास काय करावे? कुणाकडे जावे? कुठे तक्रार करावी? कार्यालय कुठे आहे? फोन नंबर कुठे मिळेल? असे अनेक प्रश्‍न पडतात.

महत्त्वाची बातमी - तुमची मुलगी वयात आली का? लक्ष द्या, तिच्यासोबत होऊ शकते असे काही...

मात्र, या समस्यांवर योग्य समाधान मिळत नसल्याने शासकीय कर्मचाऱ्यांचे फावते. तसेच लाच देऊनच काम केले जाते. काहींना साध्या कामासाठी मोठ्या रकमेची लाच मागितली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत द्वेष निर्माण होऊन ते लाचलुचपत विभागाची पायरी चढतात. ग्रामीण विभागातील शासकीय कार्यालयात जाणाऱ्या अनेकांना लाच मागितल्यास कुठे तक्रार करावी? याबाबत माहिती नसते.

काहींनी एसीबीची माहिती काढल्यास तक्रार नोंदविण्यासाठी नागपुरात स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून येणे शक्‍य होत नाही. अशा परिस्थितीत एसीबीने पुढाकार घेतला असून चक्‍क "फोन करा तक्रार नोंदवा' अशी संकल्पना आणली आहे. फोनवरून तक्रार नोंदविल्यास त्याची शहानिशा केल्यानंतर लाच मागितल्याचे सापळे रचणे शक्‍य होणार आहे.

हेही वाचा - अंघोळ करीत होती महिला अन् युवकाने साधली ही संधी...

काय करेल एसीबी

ग्रामीण भागातील व्यक्‍ती किंवा आर्थिक स्थिती योग्य नसलेल्या व्यक्‍तीने एसीबीला कॉल करावा. शासकीय कर्मचाऱ्याने लाच मागितल्याचे फोनवरून सांगावे. एसीबीचे अधिकारी त्या व्यक्‍तीच्या गावात जाऊन भेट देतील. तक्रारीची शहानिशा करतील. तक्रारीत तथ्य आढळल्यास त्याची रीतसर तक्रार नोंदवून कारवाई करतील. 

indian police clipart साठी इमेज परिणाम

फलक लावण्यास नकार

'लाच मागू नका-देऊ नका' अशा स्वरूपाचे फलक प्रत्येक शासकीय कार्यालयात लावण्याची संकल्पना एसीबीने मांडली. मात्र, हा फलक लावण्यास चक्‍क शासकीय अधिकाऱ्यांनी नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. हा फलक लावल्यास शंभरातून पाच जणांनी जरी तक्रार केल्यास थेट कार्यालयातील दोन ते तीन कर्मचारी अटकेत जाणार तसेच विभागाची बदनामीही होणार, या भीतीपोटी अधिकारी कार्यालयाच्या बाहेर लाचखोरी थांबविण्यासाठी तयार करण्यात आलेला फलक लावण्यास नकार असल्याची माहिती आहे. 

लाचखोरीविरुद्ध निर्भयपणे समोर या
ग्रामीण भागातील ज्यांची आर्थिक स्थिती योग्य नाही, अशा तक्रारादारांपर्यंत स्वतः एसीबी अधिकारी पोहोचतील. त्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जाईल. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तक्रारदारांनी लाचखोरीविरुद्ध निर्भयपणे समोर यावे, एसीबी त्यांना पूर्णपणे सहकार्य करेल. 
- राजेश दुधलवार, 
अपर पोलिस अधीक्षक, एसीबी, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB will take your Complaints From Your Place