भक्तांच्या जयघोषांनी दुमदुमणार मंदिरांचे परिसर; तब्बल 8 महिन्यांनी आज उघडणार पट 

All temples are getting open from tomorrow
All temples are getting open from tomorrow

नागपूर:  कोरोनाच्या धास्तीने मार्च महिन्यापासूनच बंद करण्यात आलेली राज्यभरातील धार्मिकस्थळे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर (ता. १६) सोमवारपासून भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याची परवानगी शासनाने दिली. त्यानुसार उपराजधानीतील धार्मिकस्थळांवर उपायोजना सुरू करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच्या काटेकोर पालनावर समित्यांनी विशेष भर दिला आहे. म्हणजेच नियमांचे पालन करून जयघोष आरंभ होणार आहे.

कोरोनाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आले. ‘पुनश्च हरिओम’ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर धार्मिकस्थळी नित्य उपासना व धार्मिक विधीला परवानगी दिली होती. पण, दर्शनाला बंदी कायम असल्याने आठ महिन्यांपासून भाविकांच्या जीवाला घोर लागला होता. सोमवारपासून मंदिरांसह सर्व धर्मियांच्या धार्मिकस्थळी दर्शनबारी सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये चैतन्य परतले आहे. धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या समित्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटोकोर पालन व्हावे यादृष्टीने बॅरिगेटिंग करण्यात आले. रविवारी आतील भागात सॅनेटायझेशन करण्यात आले. गर्भगृहात एकाच वेळी मोजक्या भाविकांनाच सोडले जाणार असून, ठराविक अंतरावर उभे राहूनच दर्शन घेता येईल.

नागपूरकरांचे आराध्य दैवत टेकडी गणेशाचे दर्शन सोमवारपासून सुरू करण्यात आले. रविवारी मंदिराच्या आवारात निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोबतच भाविकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर गोल आखले आहेत. तिथूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. प्रारंभी भाविकांना सॅनेटायझरने हात स्वच्छ करावे लागतील. गर्भगृहात एकाच वेळी २५भाविक राहू शकतील. आरतीच्या वेळी संख्या केवळ २५ असेल. शिवसेनेतर्फे सोमवारी सकाळी १० वाजता टेकडी गणेश मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे.

कोराडी मंदिर ११ वाजतापासून खुले

पोद्दारेश्वर राम मंदिरात अभिषेक व आरतीनंतर सकाळी ६.३० वाजतापासून भाविकांना दर्शन दिले जाईल. भाविकांना मास्क आवश्यक असून, प्रथम हात स्वच्छ धुतल्यावरच प्रवेश दिला जाईल. ठराविक अंतर कायम ठेवले जाईल. मंदिराचा कोणताही कर्मचारी किंवा सेवेकरी थेट भाविकांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेण्यात येईल. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर सोमवारी सकाळी ११ वाजतापासून सर्व भक्तांच्या दर्शनासाठी खुले होत आहे. संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पूजा आणि आरती होईल. सरकारच्या निर्देशांचे पालन करीत भक्तांना मातेचे दर्शन घेता येईल. रामदासपेठेतील गुरुद्वारही सत्संग, अन्य विधी व भाविकांसाठी सज्ज आहे. सोमवारी पहाटे पाच वाजतापासून भाविकांना प्रवेश दिला जाईल. सेवादारांकडून नियमित स्वच्छता केली जात आहे.

दीक्षाभूमीवरही धम्मघोष

शासनाच्या निर्णयानुसार दीक्षाभूमी अनुयायांच्या दर्शनासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी भंतेंच्या उपस्थितीत धम्मदेसना होईल. यानंतर धम्मघोषासह दीक्षाभूमीचेद्वार उपासकांसाठी खुले करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील अस्थिकलशाला अभिवादनही करता येईल, असे स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com