दोन उपचार पद्धतीचा वाद चव्हाट्यावर; मग काय अलोपॅथीने पुकारला बंद

Allopathy clinics closed today
Allopathy clinics closed today

नागपूर : आयुर्वेद शाखेतून वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या वैद्यकतज्ञांना किरकोळ शल्यक्रिया करण्यास मुभा देण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी डॉक्टरांमध्ये जुंपली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात ‘आयएमए’ शुक्रवारी संप पुकारला आहे. संपाच्या काळात दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला असून आयुर्वेद डॉक्टरांच्या ‘निमा’ संघटनेतर्फे मात्र, दवाखाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच अध्यादेश जारी करीत आयुर्वेद शाखेतून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आयुर्वेद चिकित्सकांना ५८ प्रकारच्या किरकोळ शल्यक्रिया करण्याची परवानगी दिली आणि तशी नोंद अधिकृतरीत्या गॅझेटमध्ये केली.

केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या कायद्यात हे यापूर्वी नमूद होते. परंतु, आता केंद्र सरकारने गॅझेटमध्ये स्थान दिल्याने आधुनिक वैद्यक आणि आयुर्वेद डॉक्टरांच्या संघटनांमध्ये वादाला तोंड फुटले. ‘निमा’ (नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन) आणि ‘आयएमए’ या डॉक्टर संघटना आमनेसामने आल्या आहेत.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ चा आयुर्वेद शाखेला विरोध नाही. पण अशा प्रकारची सरमिसळ सरकारने करू नये. सरकारने आयुर्वेद संशोधन आणि विकासावर भर द्यावा. शस्त्रक्रियेला परवानगी देऊ नये. नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी न घेता आयुर्वेद काऊंसिलने परिपत्रक काढणे जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी घातक आहे,’ असे आयएमएतर्फे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी म्हटले आहे. 

सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद

आयएमएच्या नागपूर शाखेतर्फे गुरूवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळात खासगी दवाखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. बाह्यरुग्ण विभाग पूर्णता बंद असणार आहे. ११ डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या अ‍ॅलोपॅथी रुग्णालये बंद आंदोलनात अत्यावश्यक सेवा व कोविड रुग्णसेवा व्यतिरिक्त इतर सेवा बंद राहतील, असे आयएमएच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी म्हणाल्या. यावेळी आयएमचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ अशोक अढाव, राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, नागपूर शाखेचे सचिव डॉ़ राजेश सावरबांधे, माजी अध्यक्ष डॉ़ प्रशांत निखाडे, डॉ़ वैशाली खंडाईत, डॉ़ वर्षा ढवळे, डॉ. संजय देशपांडे उपस्थित होते. 

सामान्यांची दिशाभूल सुरू केली
केंद्राने गॅझेटमध्ये या शल्यक्रियांचा समावेश करून आयुर्वेद चिकित्सकांना अधिकृत स्थान दिले. हा वाद यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातही गेला होता. आयएमएला तिथे अपयश आल्यानंतर त्यांनी आता सामान्यांची दिशाभूल सुरू केली आहे. मागील ४० वर्षांपासून आयुर्वेद डॉक्टर शल्यक्रिया करीत आहेत. यामुळे आयएमएच्या बंदमध्ये ब्लॅक विरुद्ध पिंक रिबन बांधून आम्ही रुग्णसेवा देणार आहोत.
- डॉ. मोहन येंडे,
राज्य संघटक (निमा)

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com