अखेर सात महिन्यानंतर 'आपली बस' सुरू, प्रवाशांना दिलासा

टीम ई सकाळ | Wednesday, 28 October 2020

आजघडीला संपूर्ण राज्यात १०० टक्के प्रवासी क्षमतेसह राज्य परिवहन बस सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर नागपूर शहरातील आपली बस सेवा सुरू करण्यात यावी,  अशी मागणी केली जात होती. त्यानुसार आजपासून 'आपली बस' शहरातील रस्त्यांवर धावायला सुरुवात झाली आहे. 

नागपूर : गेल्या मार्चपासून बंद असलेल्या शहर बससेवेतील 'आपली बस' पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळत ५० टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

मिशन बिगीन अगेनअंतर्गत शहरातील अनेक कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय उद्योग, व्यापार, दुकानेही सुरू आहेत. येथे काम करणारा वर्ग गरीब असून त्यांच्याकडे दुचाकी वाहनांचाही अभाव आहे. याशिवाय ज्यांच्याकडे दुचाकी आहे, त्यांना दररोज पेट्रोलचा खर्च परवडत नाही. अशा मजूर, कर्मचारी वर्गासाठी बससेवा सुरू करण्याच्या मागणीने काही दिवसांपासून जोर धरला होता. शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबत आयुक्तांना पत्रही दिले होते. त्यानंतर परिवहन समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली होती. त्यावेळी परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी ५० टक्के प्रवाशांसह बस सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

हेही वाचा - वाघोबा पुढ्यात, शेतकरी मचाणावर ! काय घडले असेल तेव्हा...

राज्य शासनातर्फे अनलॉक करण्यात आले असून राज्य परिवहन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आजघडीला संपूर्ण राज्यात १०० टक्के प्रवासी क्षमतेसह राज्य परिवहन बस सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर नागपूर शहरातील आपली बस सेवा सुरू करण्यात यावी,  अशी मागणी केली जात होती. त्यानुसार आजपासून 'आपली बस' शहरातील रस्त्यांवर धावायला सुरुवात झाली आहे. 

हेही वाचा - कठोर मुलीला बाप नको होता; पण, चार लाख मिळविण्यासाठी...

शहरातील गरीब मजूर, कर्मचारी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेता आपली बस सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोविडच्या संसर्गाचा धोका होऊ नये यासाठी काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करून आपली बस सुरू करण्यात आली आहे. आपली बस सुरू झाल्यामुळे व्यवसाय, उद्योग करणारे, कामगार वर्ग, कर्मचारी यांना दिलासा मिळाला आहे. दररोज वाहतुकीमुळे होणारा त्रास आता होणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केल्या आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत