'आपली बस' पुन्हा धावणार, परिवहन सभापतींची प्रस्तावाला मंजुरी

राजेश प्रायकर
Wednesday, 30 September 2020

मिशन बिगीन अगेनअंतर्गत शहरातील अनेक कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय उद्योग, व्यापार, दुकानेही सुरू आहेत. येथे काम करणारा वर्ग गरीब असून त्यांच्याकडे दुचाकी वाहनांचाही अभाव आहे. याशिवाय ज्यांच्याकडे दुचाकी आहे, त्यांना दररोज पेट्रोलचा खर्च परवडत नाही.

नागपूर : गेल्या मार्चपासून बंद असलेल्या शहर बससेवेतील आपली बस पुन्हा धावण्याचे संकेत परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांनी आज दिले. परिवहन विशेष समितीच्या बैठकीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ५० टक्के प्रवासी संख्येसह आपली बस सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत शहरातील अनेक कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय उद्योग, व्यापार, दुकानेही सुरू आहेत. येथे काम करणारा वर्ग गरीब असून त्यांच्याकडे दुचाकी वाहनांचाही अभाव आहे. याशिवाय ज्यांच्याकडे दुचाकी आहे, त्यांना दररोज पेट्रोलचा खर्च परवडत नाही. अशा मजूर, कर्मचारी वर्गासाठी बससेवा सुरू करण्याच्या मागणीने काही दिवसांपासून जोर धरला. शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबत आयुक्तांना पत्रही दिले. परिवहन समितीच्या बैठकीत आज यावर चर्चा झाली. सभापती बाल्या बोरकर यांच्यासह परिवहन व्यवस्थापक शकील नियाजी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, अरुण पिंपरुडे, विनय भारद्वाज बैठकीत उपस्थित होते. परिवहन समिती सदस्य नितीन साठवणे, रुपा राय, वैशाली रोहनकर, रुपाली ठाकूर, राजेश घोडपागे यांनी ऑनलाइन पद्धतीने बैठकीत भाग घेतला. 

हेही वाचा - कुख्यात डॉन संतोष आंबेकरवर मकोका, जमीन विक्रीत फसवणूक केल्याने गुन्हा दाखल

राज्य शासनातर्फे अनलॉक करण्यात आले असून राज्य परिवहन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आजघडीला संपूर्ण राज्यात १०० टक्के प्रवासी क्षमतेसह राज्य परिवहन बस सेवा सुरू आहे. त्याच धर्तीवर नागपूर शहरातील आपली बस सेवा सुरू करण्यात यावी, याविषयी समितीच्या बैठकीत सदस्यांनी चर्चा केली. शहरातील सर्वच आस्थापना, व्यवसाय, उद्योग, कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपली बसच्या आधारे कामावर जाणा-यांचे चांगलेच हाल होत आहेत. आपली बस सेवा बंद असल्यामुळे प्रवासासाठी गरिबांना जादा भाडेही द्यावे लागत आहे. त्यामुळे शहर बस सेवा सुद्धा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी समितीच्या सदस्यांनी केली. ५० टक्के प्रवासी वाहतुकीसह आपली बस सुरू करणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने बसमध्ये आवश्यक त्या सर्व नियमांच्या पालनासह बस सेवा सुरू करण्याचे प्रस्तावाला बाल्या बोरकरने मंजुरी प्रदान केली.

हेही वाचा - अचानक का कमी झाली कोरोना बाधितांची संख्या? अतिशय धक्कादायक कारण आले समोर 

शहरातील गरीब मजूर, कर्मचारी वर्गाला होणारा त्रास लक्षात घेता आपली बस सुरू करण्याची गरज आहे. मात्र, कोविडच्या संसर्गाचा धोका होऊ नये यासाठी काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनेसह बस सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात येणार आहे, असे परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी सांगितले.
संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apali bus will start again with fifty percent passenger in nagpur