यंदा 'एप्रिल फूल' बनवणे पडू शकते महागात, हे आहे कारण...

crime
crime

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही मित्रांना 'एप्रिल फूल' करण्याचा हेतू असेल तर नागरिकांनी स्वतःला आवरणे आवश्‍यक आहे. 'एप्रिल फूल'निमित्त इतरांना मूर्ख बनविण्यास उचललेले पाऊल थेट कोठडीत जाण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही नागरिक सोशल मिडियाचा गैरवापर करून नको त्या अफवांच्या पोस्ट टाकण्याची शक्‍यता असून पोलिसांनीही याबाबत कंबर कसली आहे. आतापर्यंत अफवा पसरविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली, हे विशेष. 

उद्या, 1 एप्रिल असून दरवर्षी मित्रांना फोन करून किंवा संदेश पाठवून मूर्ख बनविले जाते. अलीकडच्या काही वर्षात फोन किंवा संदेशापुरताच एप्रिल फूलचा दिवस राहिला नसून सोशल मिडियावरही 'पोस्ट' टाकून केवळ मित्रच नव्हे तर नेटिझन्सलाही मूर्ख बनविण्याची धडपड करताना अनेक तरुण दिसून आले. मात्र, यंदा कोरोनाची सर्वत्र भीती आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. भीतीने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. यात काही नागरिकांचा अपवाद आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील वातावरण गंभीर असून नागरिकांनी संवेदनशीलतेने वागण्याची गरज आहे. मात्र, काही तरुणांकडून एप्रिल फूलच्या नावावर संवेदनशीलतेला मूठमाती देण्याची शक्‍यता आहे. या तरुणांनी एप्रिल फूलच्या नावावर अफवा किंवा गैरसमज पसरविण्याचा प्रकार केल्यास त्यांना थेट कोठडीत जावे लागणार आहे. त्यामुळे यंदा कुणाला एप्रिल फूल करण्याच्या नादात अफवा तर पसरवित नाही ना, याची खबरदारी घेण्याची गरज सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली.

किंबहुना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुणीही एप्रिल फूलनिमित्त कुणाला मूर्ख बनविण्याची जोखीम पत्करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. नागरिकांनी अफवा पसरविल्यास त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागण्याची शक्‍यता आहे. एप्रिल फूलनिमित्त अफवा, गैरसमज पसरविणाऱ्यांवर पोलिसांचेही लक्ष आहे. पोलिसांनी आतापर्यंत चौघांना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अफवा पसरविणाऱ्यांना अटक केली. यात एक रामटेकचा असून तिघे शहरातील आहेत. यातील एकाला आज अटक करण्यात आली. 

या मॅसेजपासून रहा सावध
शहरात संचारबंदी व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. एप्रिल फूलनिमित्त काही विकृत तरुण किंवा इतरांकडून संचारबंदी उठली, नागरिकांना सरकारचा दिलासा असे काही मॅसेज पाठविले जाण्याची शक्‍यता आहे. या मॅसेजपासून सावध राहण्याची गरज आहे. अशा मॅसेजमुळे लोकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्‍यता बघता सायबर पोलिसांनीही कंबर कसली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com