भयंकर! ट्रक अंगावर घालून चक्क तलाठ्याला चिरडण्याचा प्रयत्न; वाळू तस्करांची हिंमत वाढली

Attempt to kill Talathi in Nagpur Gramin
Attempt to kill Talathi in Nagpur Gramin

कामठी (जि. नागपूर) : वाळूचा अवैध उपसा थांबवून कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या अंगावर ट्रक चढविण्याचा प्रयत्न वाळू तस्कराने केला. ही खळबळजनक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी ट्रकचालकाला वाहनासह जरीपटक्यातून अटक केली. महेंद्र अंकुश वाहाणे (वय ४२, रा. रामगढ, नवीन कामठी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्माकर परसरास अगम (४२, रा. केटीपीएस कॉलनी, कोराडी) मसाळा येथे तलाठी पदावर कार्यरत आहे. कोराडी हद्दीतील उप्पलवाडी रोड खसाळा येथे एमएसईबीची मोकळी जागा आहे. या भागात ट्रक क्रमांक (एमएच/३१/एपी/१५२९) चा आरोपी ट्रक चालक हा आपल्या वाहनात अवैधरीत्या वाळू चोरी करून भरत होता.

दरम्यान तलाठी पद्माकर अगम तेथे आले. त्यांनी वाळू तस्कराला रोखण्याच्या प्रयत्न केला. मात्र, आरोपी ट्रक चालकाने पद्माकर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणला. इतकेच नाही तर आरोपी ट्रक चालकाने पद्माकर यांच्या अंगावर वेगाने ट्रक चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात पद्माकर थोडक्यात बचावले.

याप्रकरणी पद्माकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरोधात ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध सुरू केला. कोराडी पोलिसांनी पळून गेलेला ट्रक जरीपटक्यातील नारी रोडवर असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून महेंद्र वाहाणे याला अटक केली. त्याने गुन्हा कबूल केला.

वाळूतस्करांची हिंमत वाढली

काही वाळू तस्करांना पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तस्करांची हिंमत वाढली आहे. आज वाळू माफियाकडून तलाठ्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तस्कर भविष्यात पोलिसांवरही हल्ला करू शकतात. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी वेळीच दखल घेण्याची गरज आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com