Awareness about water conservation through Water Week
Awareness about water conservation through Water Week

‘जल है तो कल है’; आज पाणी वाया जाईल, तर उद्या तहान जीव घेईल!

नागपूर : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे महत्त्व व त्याचा नियोजनबद्ध वापर करून शाश्वतात टिकवून ठेवण्यासाठी २२ मार्च जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात २२ ते २७ मार्चपर्यंत ‘जल सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करून लोकांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्व, त्याचे मूल्य व ते टिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत जागृती करून कृती करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

‘जल है तो कल है’ असे आपण नेहमीच म्हणतो. परंतु, पाण्याचा काटकसरीने वापर, भविष्यातील पाण्याचे नियोजन करताना मात्र कुणीही दिसत नाही. प्रत्येक उन्हाळ्यात पाण्याची भीषणता जाणवायला सुरुवात होते. मग आपल्याला पाण्याची महती कळते. पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून त्याच्या सर्वकाळ उपलब्धतेसाठी सर्वांचे लक्ष केंद्रित करून सर्वव्यापी उपाययोजना करण्यासाठी संयुक्त राष्ट्राद्वारे सन १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो.

जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जगातील शुद्ध व सुरक्षित पाण्याशिवाय जगणाऱ्या जनसमुदायात जागृती निर्माण केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने इतर सर्वच विभागांच्या सहकार्याने २२ ते २७ मार्चपर्यंत जल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाअंतर्गत जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत व साठवण टाकींची सफाई करणे, पाण्याविषयी विविध वक्ते व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पाण्यावरील लोकगीते, रांगोळी स्पर्धा, पाणी आणि माणूस या विषयावर पोस्टर स्पर्धा, जलसाक्षरता विषयावर छोटी नाटिका, मानवी हस्तक्षेप पाणी प्रदूषणाचे कारण या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाणी वाचवा आवाहन करण्यासाठी जास्तीत जास्त ई-स्पर्धांचे ग्रामपंचायत स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे.

पाणी, पाण्याचे मूल्य, पर्यावरण बदल, अटल भूजल योजना आदी विषयांवर सीईओ योगेश कुंभेजकर हे निवडक सरपंचांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहे. जिल्ह्यात कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाची परिस्थिती लक्षात घेता सर्व खबरदारी घेऊन स्पर्धा, कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या जलसप्ताहामध्ये जिल्ह्यातील ग्राम पंचायतीमधील सर्वच वयोगटातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सीईओ योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com