कोण होते 'जयभीम'चे जनक? का अजूनही आहेत उपेक्षित? 

केवल जीवनतारे
रविवार, 12 जानेवारी 2020

आंबेडकरी समाजातील राजकारणात गटा-तटात विभागलेले नव्हे तर भरकटलेले रिपब्लिकन नेते असोत की, कॉंग्रेस, भाजप, डाव्या पक्षात स्थिरावलेले नेते असोत. त्यांच्या मुखातूनही "जयभीम' हाच क्रांतीनाद बाहेर येतो. हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्यानंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी, यासाठी जयभीम हा शब्द मोठ्या आदरभावाने संबोधला जातो. 

नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीचा सोहळा असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीतील महापरिनिर्वाणदिन... किंवा दोन आंबेडकरी माणसांच्या भेटीचा क्षण... सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादला जातो तो म्हणजे 'जयभीम'... जयभीम ही आंबेडकरी समाजाची कवच कुंडले आहेत. एकमेकांना अभिवादन करण्यासाठी "जयभीम' हा क्रांतिकारक शब्द देणारे बाबू हरदास एल. एन. मात्र अजूनही उपेक्षित आहेत.

काय झालं असेल ? - घर हाकेच्या अंतरावर असताना चिमुकला स्कूलबसमधून उतरला अन्‌...

क्रांतीची पेरणी करणारा जयभीम हा शब्द देणारे हरदास लक्ष्मणराव नगराळे ऊर्फ बाबू हरदास एल. एन. यांचा जन्म सहा जानेवारी 1904 रोजी नागपुरातील कामठी येथे झाला. वडील लक्ष्मणराव नगराळे रेल्वे खात्यात होते. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. संस्कृतवरही त्यांचा प्रभाव होता. अवघ्या 17 व्या वर्षी "महारठ्ठ' नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. कामठी येथे रात्र शाळा चालवली. 

1928 साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेत गेल्यानंतर अस्पृश्‍यांचा नेता कोण, असा सवाल पुढे आल्यानंतर बाबू हरदास एल. एन. यांनी रॅमसे मॅक्‍डोनाल्ड यांना भारतातून 32 "तार' पाठवून देशात अस्पृश्‍यांचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत, असे सुचविले. त्यांनी मॅकडोनाल्ड यांच्याशी जवळपास 32 वेळा पत्रव्यवहार केला होता.

हेही वाचा - ड्युटी बजावण्यासाठी होता रस्त्याच्या कडेला उभा अन्‌ घडले अघटित...

'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्‍लासेस फेडरेशन'च्या पदावर सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 1924 साली त्यांनी "मंडल महात्मे' हा ग्रंथ लिहिला. "वीर बालक' नावाचे नाटकही लिहिले. बाबासाहेबांच्या "जनता' वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केले. 1937 साली नागपूर-कामठी या मतदारसंघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे 12 जानेवारी 1940 साली अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले.

'जयभीम' हाच क्रांतीनाद बाहेर येतो

आंबेडकरी समाजातील राजकारणात गटा-तटात विभागलेले नव्हे तर भरकटलेले रिपब्लिकन नेते असोत की, कॉंग्रेस, भाजप, डाव्या पक्षात स्थिरावलेले नेते असोत. त्यांच्या मुखातूनही "जयभीम' हाच क्रांतीनाद बाहेर येतो. हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्यानंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी, यासाठी जयभीम हा शब्द मोठ्या आदरभावाने संबोधला जातो. 

Image may contain: 1 person, closeup

इतिहास प्रेरणादायी 
आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत म्हणून हरदास एल. एन. यांचे नाव इतिहासात कोरले आहे. निष्ठावंत कार्यकर्ते घडविण्यासाठी यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. मात्र, या कामठीत त्यांचे प्रेरणादायी स्मारक नाही. 80 वर्षांपासून कामठीत हरदास मेळा भरतो; परंतु रिपब्लिकन नेत्यांना "जयभीम'चे जनक बाबू हरदास यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करावेसे वाटत नाही. समाजही त्यांच्याबाबतीत अज्ञानी असल्याने बाबू हरदास अद्यापही दुर्लक्षितच राहिले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घ्यावा आणि स्मारक उभारावे. 
- भन्ते नागदीपंकर थेरो, 
मुख्य मार्गदर्शक, हरदास मेळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babu Hardas L. N. Still neglected