पुन्हा खड्ड्यांत गेले नागपूर! 

file photo
file photo

नागपूर : नागपूर शहर आणि उपनगरी परिसर सध्या शहरातील खड्ड्यांमुळे चर्चेत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची करण्यात येणारी डागडुजी करण्यात न आल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवरसुद्धा झाला असल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. 

काही महिन्यांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एकाचा बळी गेला. तर, 28 जण जखमी झाले होते. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. जी अद्याप प्रलंबित आहे. या काळात अजनी चौक ते खामला रोड, डिप्टी सिग्नल रोड, ऑटोमोटिव्ह चौक, कळमना मार्केट रोड, टिपू सुलतान चौक, सीआरपीएफ गेट ते इसासनी, वर्धमाननगर, गोधनी रोड, या अन्‌ अशा शहरातील अनेक परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. 

रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे रस्ता आहे की तलाव, असा प्रश्‍न पडतो आहे. शहरामध्ये सुरू असणारी इतर विकासकामेसुद्धा रेंगाळली आहेत. त्यामुळे फुटाळा तलाव परिसर, मनीषनगर परिसर, जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन ते जयताळा रोड, मेडिकल रुग्णालय परिसर, तुकडोजी पुतळा परिसर, नेल्को सोसायटी, इसासनी रोड या भागातील वाहन चालक जीव धोक्‍यात घालून वाहने चालवत आहेत. शहरातील रस्त्यांची बिकट परिस्थिती असूनसुद्धा महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक आणि महापालिका आयुक्त राजकारणामध्येच व्यस्त आहेत. 
 

रस्ते झाले उंच; ड्रेनेज मात्र तुडुंब 
पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील अनेक नाल्यांची साफसफाई केल्याचे महापालिका प्रशासन सांगते. असे असले तरी ड्रेनेजची साफ करण्याच्या कामाला अद्याप सुरुवातच झाली नाही. त्यामुळे पहिल्या पावसामधेच शहरातील खोलगट भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. व्हेरायटी चौक, मेडिकल चौक, जगनाडे चौक, अनंतनगर, त्रिमूर्तीनगर रिंगरोड, दयानंदनगर, ज्योतीनगर, जरीपटका, शंकरनगर परिसरातून जाणाऱ्या वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच अनेक रस्त्यांचे सिमेंटीकरण झाल्यामुळे रस्त्यांची उंची वाढली आहे. बहुतांश चौक खोलगट झाल्याने चौकाच्या मधोमध पावसाचे पाणी साचते.  

\अर्धवट विकासकामे जीवघेणी 
अजनी मेट्रो स्टेशनजवळ एका 23 वर्षीय दुचाकीस्वार युवकाला गतिरोधकामुळे गाडी उसळल्याने आपला जीव गमवावा लागला. 14 जून रोजी रात्री ही घटना घडली असून अतुल कृष्णा पाठक असे या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रात्रीच्या वेळी आवश्‍यक लाइट किंवा रेडियम लावले नसल्याने त्याला गतिरोधक दिसू शकला नाही. शहरात विकासकामे सुरू असलेल्या बहुतांश ठिकाणी हीच परिस्थिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com