नागपूर रेल्वेस्थानकावर आता बॅग सॅनिटाईजर, आयआयटी दिल्लीने विकसित केली ही मशीन...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अभिनव सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वेचा भर आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकांवर अनेक अभिनव कल्पनांच्या अंमलबजावणीतून उत्पन्न मिळविले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळातही चार कंपन्यांसोबत अभिनव सुविधांसंदर्भातील करार करण्यात आले आहे.

नागपूर : कोरोनाच्या संकटकाळात सुरक्षात्मक उपायोजनेवर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने भर दिला आहे. विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने नवनवीन उपकरणे रेल्वेस्थानकांवर उपलब्ध करून दिली जात आहेत. त्याच शृंखलेत बॅग सॅनिटायझर व रॅप मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यंत्राद्वारे इच्छुक प्रवाशांना त्यांचे बॅग व्यवस्थित सॅनिटाईझ आणि रॅप करून मिळतील. यामुळे संसर्गाचा धोका टाळणे शक्‍य होणार आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने यापूर्वी मास्क वेडिंग मशीन, स्पीट बॉक्‍स वेडिंग मशीन उपलब्ध करून दिली आहे. पुढच्या टप्प्यात सॅनिटाईझ ऍन्ड रॅप मशीन लावण्यात आले आहे. या सुविधेसाठी नागपूर विभागाने दिल्लीच्या मे. बुकबॅगेज डॉट कॉम एलएलपी कंपनीसोबत करार केला आहे. हे उपकरण स्वच्छतेच्या दृष्टीने आयआयटी दिल्लीच्या टीमने विकसित केले. यापूर्वी अहमदाबाद रेल्वेस्टेशनवर हे यंत्र लावण्यात आले असून, हे यंत्र लावणारे नागपूर हे दुसरे रेल्वेस्थानक ठरले आहे.

Video : प्रसूतीनंतर ती वारंवार म्हणत होती 'मी मरेन, मी मरेन', तरीही कुणी लक्ष दिले नाही...

कोरोनाचे संकट कायम असून संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रवासी सर्व प्रकारची काळजी घेतात. पण, प्रवासादरम्यान बॅग किंवा अन्य साहित्याची काळजी घेणे शक्‍य होत नाही. यामुळे मनात नेहमी संसर्गाची भीती असते. अशात हे उपकरण उपयोगी सिद्ध होणार आहे. बॅग रॅप मशीनद्वारे संपूर्ण बॅगचे पूर्वी निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर बॅग पूर्णत: रॅप होते. यामुळे विषाणू आत शिरण्याचा प्रश्‍नच येत नाही.
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णार्थ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय सी थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य यांच्या उपस्थितीत कराराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

साडेपाच लाखांचे उत्पन्न

उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने अभिनव सुविधा उपलब्ध करून देण्यावर रेल्वेचा भर आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकांवर अनेक अभिनव कल्पनांच्या अंमलबजावणीतून उत्पन्न मिळविले जात आहे. कोरोनाच्या संकटकाळातही चार कंपन्यांसोबत अभिनव सुविधांसंदर्भातील करार करण्यात आले आहे. बॅग सॅनिटाईज व रॅप या सुविधेतूनही रेल्वेला वार्षिक साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bag sanitizer machine at Nagpur railway station