बजाजनगर पुन्हा कोरोनाच्या नकाशावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

खासगी रुग्णालयातील बाधित परिचारिका मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातून हलवलेल्या कोरोनाबाधित वृद्धाच्या संपर्कात आली होती. हा वृद्ध उपचारादरम्यान मेडिकलमध्ये दगावला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून वृद्धाच्या संपर्कात आलेल्या खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या चाचण्या केल्या. त्यात एक परिचारिका बाधित आढळली. खासगी रुग्णालयात खळबळ उडाली होती

नागपूर : कोरोनाचा दर दिवसाला उद्रेक होईल, अशीच स्थिती निर्माण होत आहे. हावरापेठ असो की, सतरंजीपुरा अवघे कुटुंब कोरोनाने विळख्यात घेतले आहेत. दर दिवसाला कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढतच आहे. सोमवारी 20 जणांना बाधा झाल्याचे उघड झाले. तर मंगळवारी (ता.2) हा आकडा आणखी वाढला. शहरात आणखी 24 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मेयो, मेडिकल, नीरी आणि एम्सच्या प्रयोगशाळेतून पुढे आले. विशेष असे की, पहिला कोरोनाबाधित बजाजनगरात आढळून आला होता. यानंतर तब्बल 61 दिवसांनंतर बजाजनगर पुन्हा कोरोनाच्या नकाशावर आले आहे. कोरोनाबाधित आढळून आलेली परिचारिका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. या रुग्णालयातील 66 जण विलगीकरणात ठेवण्यात आले. यामुळे एकूण बाधितांची संख्या 583 वर पोहोचली आहे. 

लग्न करताय? यवतमाळकरांसाठी हा आहे स्पेशल "कोरोना पॅकेज' 

धोक्‍याची घंटा... 

11 मार्च रोजी बजाजनगर येथून शहरात कोरोनाची लागण सुरू झाली होती. मेयोतील यशस्वी उपचारातून बजाजनगरातील पती-पत्नी दोघेही कोरोनामुक्त झाले. त्यानंतर येथे रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता एक परिचारिका बजाजनगरात आढळून आली. कोरोनाची दहशत अनुभवायला येईल का? अशा विचारांचे काहूर या भागातील नागरिकांच्या मनात उठले आहे. ही परिचारिका धंतोली येथील खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. परिचारिकेसह नवीन बाधितांमध्ये टिमकी परिसरातील 9 तर, मोमिनपुरा येथील 1, नाईक तलाव येथील 2 तर लोकमान्य नगरातील 2 रहिवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले. याशिवाय हंसापुरी येथील एकाला बाधा झाल्याचे पुढे आले. याशिवाय महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांसह भानखेड्यातील दोघे बाधित आठळले. हे सर्व आमदार निवास येथील विलगीकरणात होते. 

66 जणांना विलगीकरणात 

खासगी रुग्णालयातील बाधित परिचारिका मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातून हलवलेल्या कोरोनाबाधित वृद्धाच्या संपर्कात आली होती. हा वृद्ध उपचारादरम्यान मेडिकलमध्ये दगावला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून वृद्धाच्या संपर्कात आलेल्या खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या चाचण्या केल्या. त्यात एक परिचारिका बाधित आढळली. खासगी रुग्णालयात खळबळ उडाली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने परिचारिकेला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवले. तर 66 आरोग्य कर्मचाऱ्यांना याच खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, खबरदारीचे सर्व उपाय या खासगी रुग्णालयात घेण्यात येत असल्याचा दावा रुग्णालय संचालकांनी केला आहे. 

आहे ना आश्‍चर्य? : अहो, उत्पादनापूर्वीच धावली रस्त्यावर कार 

उपराजधानीतून 389 कोरोनामुक्त 

मागील तीन महिन्यांत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 577 वर पोहोचली. यापैकी 389 रुग्ण बरे झाले आहेत. तर 174 कोरोनाबाधित उपराजधानीतील विविध कोविड रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी मेयो 72, मेडिकलमध्ये 82 तर आणि एम्समध्ये 20 कोरोनाबाधित दाखल करण्यात आले आहेत. यांच्यावर येथे उपचार सुरू आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajajnagar again on the map of Corona