Good News For Students : बी.एड. सीईटी परीक्षार्थ्यांची होणार विशेष परीक्षा; एकाच तारखेने गोंधळ

मंगेश गोमासे
Tuesday, 20 October 2020

बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी पदवी अंतिम वर्षाचे असतात. तर काही विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतानाही बी.एड. सीईटी देत असतात. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षांमध्येच बी.एड. सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे.

नागपूर : राज्याच्या सीईटी सेलअंतर्गत २१ ते २३ ऑक्टोबरला बी.एड. सीईटीची परीक्षा होणार आहे. यादरम्यान राज्यातील अकृषक विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षाही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठांद्वारे ‘विशेष परीक्षे’चे आयोजन करण्यात येईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन केले. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ८ ते ३० तर पुणे विद्यापीठाच्या १२ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत आहेत. इतर विद्यापीठांनीही यादरम्यान परीक्षांचे आयोजन केले. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान बी.एड. सीईटी परीक्षा होणार आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी सकाळी १० व दुपारी २ वाजता अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. याच दरम्यान पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा आहेत.

जाणून घ्या - हृदयद्रावक! आईला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ४ वर्षांच्या मुलासह बापाचा महामार्गावर टाहो

विशेष म्हणजे, बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी पदवी अंतिम वर्षाचे असतात. तर काही विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असतानाही बी.एड. सीईटी देत असतात. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षांमध्येच बी.एड. सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे.

मात्र, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे बी.एड. सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेचे ओळखपत्र दाखवून विशेष परीक्षेसाठी महाविद्यालयांकडे अर्ज करता येईल. काही विद्यापीठांमध्ये अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन तर काही विद्यापीठांमध्ये त्यांची ऑफलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

गोंधळून जाऊ नये
परीक्षार्थींचे कुठलेही नुकसान होणार नाही. त्यांनी गोंधळून जाऊ नये.
- डॉ. प्रफुल्ल साबळे,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, नागपूर विद्यापीठ

अधिक वाचा - सोन्याला झळाळी; साठ हजारांचा आकडा करेल पार, ग्राहकांची पावले वळू लागली दुकानांकडे

एका तासाआधी परीक्षेची संधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे बी.एड. सीईटी परीक्षेच्या एका तासाआधी विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी बी.एड. सीईटीच्या एका तासाआधी विद्यापीठाची परीक्षा देण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. याशिवाय हे शक्य न झाल्यास त्यांच्यासमोर विशेष परीक्षेचा पर्याय राहणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: B.Ed. Special examination will be conducted by CET candidates