अखेर भंडारा पोलिसांनी केली प्रीती दासला अटक! टोळीत आणखी चार जण

preeti-das
preeti-das

नागपूर : पोलिसांशी असलेल्या मैत्रीच्या आधारे सामान्य माणसांना नाडणाऱ्या आणि "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासला भंडारा पोलिसांनी अटक केली. तिने दोघांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांची 25 लाखांनी फसवणूक केली होती. त्या प्रकरणात प्रीतीच्या टोळीतील आणखी चार जण होते. त्यापैकी एक मोठ्या पक्षाचा पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. प्रीतीच्या एका पार्टनरला गुन्हे शाखेने अटक केली आहे. लकडगंजमधील प्रकरणात प्रीतीचा पार्टनर असलेला सावकार सतीश सोनकुसरे याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य आरोपी मंगेश पौनिकर हा फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज भागात राहणारे मेस संचालक सुनील पौनिकर यांना सतीश सोनकुसरे याने सहा लाख रुपये व्याजाने दिले. व्यवसाय बुडाल्याने सुनील हे सतीश याला पैसे परत करू शकले नाहीत. त्यामुळे सतीश आणि सुनील यांच्यात वाद होता. याचदरम्यान सतीश याची प्रीतीशी ओळख झाली.

पाचपावली व लकडगंजमधील पोलिसांशी ओळख असल्याचे सांगून प्रीतीने सतीश याला पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रीती ही पोलिसांना घेऊन सुनील यांच्या घरी गेली. यावेळी सतीश व मंगेशही प्रीतीच्या सोबत होते. प्रीतीने सुनील यांच्या पत्नीला "धंद्यावर बसवून' पैसे वसूल करण्याची धमकी दिली. याचा मानसिक धक्का सुनील यांना बसला. 27 नोव्हेंबर 2019 ला सुनील यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

प्रीती, सतीश व त्यांच्या साथीदारांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे सुनील यांनी मृत्यूपूर्वी बयाणात सांगितले होते. एक महिन्यांपूर्वी लकडगंज पोलिसांनी प्रीती व तिच्या साथीदारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रीतीविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले. प्रीतीविरुद्ध दाखल गुन्ह्यांचा तपास गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी तीन प्रकरणांमध्ये प्रीतीला अटक केली. लकडगंजमधील दाखल गुन्ह्यात प्रीतीला जामीन मिळाला असला तरी तिचा साथीदार सतीश याला जामीन मिळाला नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

 हेही वाचा - आयुक्त तुकाराम मुंढेंना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

गुन्हा दाखल होण्यास सहा महिने
पत्नीला धंद्यावर बसवून पैसे वसुल करण्याची धमकी प्रीती दासने दिल्यामुळे पती सुनीलने आत्महत्या केली. सुनीलने मृत्यूपूर्वी दिलेल्या बयाणात प्रीती दास, मंगेश आणि सतीशचे नाव सांगितले होते. मात्र, प्रीतीचे लकडगंजमधील एका पोलिस अधिकाऱ्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे तिच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास तब्बल सहा महिने लागले. थेट पोलिस आयुक्‍तांना दखल घ्यावी लागली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सुनीलने लिहिलेली सुसाईड नोटही लकडगंज पोलिसांनी बदलवली,अशी चर्चाही मध्यंतरी होती.
..........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com