भांडेवाडी डम्पिंग यार्डला आग; दहा हजारांवर नागरिकांच्या नाकातोंडात विषारी धूर

Bhandewadi dumping yard fire in Nagpur
Bhandewadi dumping yard fire in Nagpur

नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्डला शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीने परिसरातील सात ते आठ वस्त्यांमध्ये धूर पसरला. कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निघणाऱ्या विषारी धुराने वस्त्यांमधील दहा हजारांवर नागरिकांच्या आरोग्यावर पुन्हा हल्ला चढविला. आगीवर नियंत्रणासाठी अग्निशमन विभागाचे आठ बंब पाण्याचा मारा करीत होते. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू होते. मागील महिन्यातही डम्पिंग यार्डला येथे आग लागल्याने नागरिक त्रस्त झाले होते. 

दरवर्षी उन्हाळ्यात भांडेवाडी डम्पिंग यार्ड आगीचे केंद्र ठरत आहेत. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास डम्पिंग यार्डमधील कचऱ्यातून धूर निघण्यास सुरुवात झाली. मात्र, दोन तासांमध्येच आगीने कचऱ्याला कवेत घेतले. परिणामी मोठ्या प्रमाणात धूर निघाला. हा धूर डम्पिंग यार्ड परिसरातील पवनशक्तीनगर, अब्बुमियानगर, सावननगर, साहीलनगर, अंतुजीनगर, देवीनगर, सूरजननगर, संघर्षनगर, मेहरनगरात पसरला. 

डम्पिंग यार्डमधील कचऱ्याला लागलेल्या आगीतून नेहमीच विषारी धूर निघत असल्याचे यापूर्वीही पर्यावरणतज्ज्ञांनी नमूद केले. हाच विषारी धूर या वस्त्यांतील नागरिकांच्या श्‍वसनातून शरीरात शिरत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास अग्निशमन विभागाचा एक बंब पाठविण्यात आला. दोन तासांत आगीने चांगलेच रौद्र रूप धारण केले. त्यामुळे पाऊण वाजताच्या सुमारास आणखी सात बंब मदतीला आला. 

दुपारपासून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाची कसरत सुरू होती. सिव्हिल लाइन्स येथील मुख्यालयातून तसेच कळमना, सक्करदरा अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी दोन तर लकडगंज व सुगतनगर अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी एक अग्निशमन बंबातून पाण्याचा मारा करणे सुरू आहे. यापूर्वीही अनेकदा डम्पिंग यार्डला आग लागली आहे. 

कचऱ्यावर प्रक्रियेच्या केवळ वल्गनाच

कचऱ्यावर प्रक्रिया सुरू असल्याचे अनेकदा सांगण्यात आले. प्रक्रिया सुरू केली तर कचऱ्यात घट का झाली नाही? असा सवाल या परिसरातील प्रा. सचिन काळबांडे यांनी उपस्थित केला. कचऱ्यावर प्रक्रियेची केवळ वल्गनाच केल्या जात असून येथील नागरिकांच्या आरोग्याबाबत महापालिका गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

2019-20 मध्ये शहरात एकूण 1044 आगीच्या घटना घडल्या. यामध्ये 710 लहान, 140 मध्यम आणि 194 मोठ्या आगींचा समावेश असून 91 कोटी 67 लाख 71 हजार 900 रुपयांच्या संपत्तीची राखरांगोळी झाली. डम्पिंग यार्डला उन्हाळ्यात दरवर्षी तीन ते चार आगीच्या घटना घडतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com