आधी होती 700 रुपयांवर, आता आली 250 रुपयांवर

Big drop in Betel nut price
Big drop in Betel nut price

नागपूर :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर शासनाने बंदी घातली असतानाही त्याची सर्रास विक्री करून व्यापाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. त्यामुळे सुपारी माफियांनी प्रतिकिलो 700 ते 800 रुपये चढ्या भावाने विक्री करीत नफा कमावला. आता आवक सुरळीत झाल्याने भाव घटले असून प्रतिकिलो 250 ते 275 रुपये दराने सुपारी विकली जात आहे.

नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने देशातील सुपारीच्या विक्रीसाठी महत्त्वाचे शहर आहे. केरळसह दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात सुपारीची आवक शहरात होते. टाळेबंदीमुळे मध्यंतरी काही दिवस सुपारीची आवक मंदावली होती. सुपारीची टंचाई निर्माण झाल्याने सुपारी माफियांनी त्याचा फायदा घेत चढ्या दरात विक्री केली. त्यामुळे किलोमागे 700 ते 800 रुपये मोजावे लागत होते.

आता दक्षिण भारतातून सुपारीची आवक सुरळीत सुरू झाल्याने भावात घसरण झाली. परिणामी, सुपारीचे दर प्रतिकिलो 250 ते 275 रुपयापर्यंत घटले. शहरात सध्या सुपारीचा व्यवसाय होणारा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. त्यामुळे वाडी परिसरातील व्यापाऱ्यांच्या गोडाऊनमध्ये सुपारी उतरविली जात आहे. शहरातून दिल्ली, कोलकत्ता, पंजाब, हिमाचल प्रदेश, गोरखपूर, छत्तीसगड, हरियाना आदी राज्यात सुपारी मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येते.

विविध उत्पादन या परिसरात जात असल्याने त्याच्यासोबतच सुपारी पाठविणे सोपे जात असल्याने सुपीराचा व्यवसाय वाढतो आहे. मात्र, काही असामाजिक तत्त्वाचे लोक या व्यवसायाला खीळ बसवीत आहे. त्यामुळे हा व्यवसाय नागपुरातून इतरत्र हलण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रोज सात क्विंटल सुपारीची विक्री

नागपूर सुपारीच्या विक्रीसाठी महत्त्वाचे असले तरी शहरातील सुपारीची दररोजची मागणी फक्त सात ते आठ क्विंटल आहे. ही सुपारी साधारणपणे घरगुती वापरासह आणि नागपुरी खर्ऱ्यासाठी सर्वाधिक उपयोगात आणली जाते. नागपुरी खर्रा सर्वत्र प्रसिद्ध असून, याला विदर्भातच नव्हे तर इतरही राज्यात मागणी असल्याने सुपारीचा वापर देशातील इतर शहराच्या तुलनेत अधिक आहे.

सुपारीची आवक नियमित सुरू
सुपारीची आवक नियमित सुरू झालेली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून प्रतिकिलो 250 ते 275 रुपये दराने विकण्यात येत आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सुपारी विक्रीच्या दृष्टीने देशातील महत्त्वाचे शहर आहे.
शिवसिंग, सुपारी विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com