दुपारच्या जेवणासाठी दोघेही दुचाकीवर निघाले, परंतु नियतीला हे मान्य नव्हते... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

लॉकडाउन काळात तीन महिने काम बंद असल्याने एक एक दिवस काढणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. आता पंधरा दिवसांपूर्वीच काम सुरू झाले. आता कुठे दोन घास सुखाने मिळायला लागले होते.

नागपूर : लवकर घरी येतो, असे म्हणून ते घरून निघाले. मात्र, कायमचेच. त्यांच्या ऐवजी घरी आले ते त्यांचे पार्थिव. कायमचाच त्यांचा श्‍वास थांबल्याने पत्नी आणि मुलांनी हंबरडा फोडला. घरून जाऊन केवळ तीन तासच झाले होते. एक व्यक्ती घरून चालता बोलता निघतो आणि त्यांच्या मृत्यूची बातमी मिळते, यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नाही. परंतु करणार काय? नियतीलाच तेच मंजूर होते. काळरूपी ट्रकने त्यांच्या वाहनाला धकड दिली आणि दुसऱ्याच क्षणी त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास यशोधरानगर ठाण्याअंतर्गत कळमना रिंग रोड, नाग नदीच्या पुलाजवळ घडली. दीपक खांडेकर (50), रा. न्यू इंदोरा, जरीपटका असे मृताचे नाव आहे. 

दीपक यांना पत्नी आणि दोन मुले आहेत. ते पेंटिगचे काम करायचे. त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. लॉकडाउन काळात तीन महिने काम बंद असल्याने एक एक दिवस काढणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते. आता पंधरा दिवसांपूर्वीच काम सुरू झाले. आता कुठे दोन घास सुखाने मिळायला लागले होते. कळमना परिसरात काम असल्याने घराजवळचा मित्र कमलेश बोंबलेसोबत ते कामाला जात होते. 

क्लिक करा - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत
 

नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास दोघेही एका मोटारसाकलवर कामावर गेले. दुपारी लंच टाईमध्ये ते घरी जेवण करण्यासाठी येत होते. तसे लांबून जेवण करायला घरी जाणे परवडण्यासारखे नाही, कदाचित त्यांना काळानेच बोलाविले असावे. 
कमलेश मोटारसाकल चालवत होता तर दीपक मागे बसला होता. कळमना रिंग रोडने नाग नदीच्या पुलाजवळून घरी जात असताना अचानक ट्रकचालकाने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दोघेही फेकले गेले. 

जोरदार मार बसल्याने दीपक रक्तबंबाळ झाले आणि अतिरक्‍तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर कमलेश किरकोळ जखमी आहे. पाहता पाहता लोकांची गर्दी झाली. संतापलेल्या जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या. काही वेळ तणावाची स्थिती होती. यशोधनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

 
अपघाताची मिळाली सूचना

 तुझ्या वडिलांचा अपघात झाला आहे, तुम्ही लवकर या. असे कमलेशने फोन करून दीपकच्या मुलाला सांगितले. कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठले असता हंबरडा फोडला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bike rider killed in accident near yasodharanagar