बर्थडे बॉयने कापला तलवारीने केक; मग झाले असे... 

सोमवार, 22 जून 2020

तलवारीने तो गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे कळल्यानंतर शोधमोहीम राबवून पोलिसांनी आरोपी अमन उफाडे याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक मोठी तलवार आढळली. 

नागपूर : 'भाई का बर्थ डे...वाजले बारा..आ रा रा रा...' असे म्हणत त्याच्या मित्रांनी जल्लोष केला. मग तोही जोशात आला. त्याने धार तलवार हातात घेतली. चक्क तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. मात्र, या बर्थडे बॉयला आनंद साजरा करण्याची संधीच मिळाली नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

अजनी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. अमन वकील उफाडे (वय 27, रा. रहाटेनगर टोली, रमणा मारोती  मंदिराजवळ) असे आरोपीचे नाव आहे. यापूर्वी संकेत कांबळे या युवकानेही तलवारीने केक कापून बर्थडे साजरा केला होता. त्यालाही अजनी पोलिसांनी अटक केली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जूनच्या रात्री दहाच्या सुमारास अजनी ठाण्याचे पोलिस पथक हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशनसाठी गस्तीवर होते. परिसरातील एका तरुणाने त्याचा वाढदिवस तलवारीने केक कापून साजरा केला, अशी माहिती मिळाल्याने ते त्याचा शोध घेत होते. त्याच तलवारीने तो गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे कळल्यानंतर शोधमोहीम राबवून पोलिसांनी आरोपी अमन उफाडे याला ताब्यात घेतले. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक मोठी तलवार आढळली. 

हेही वाचा : नागपुरात 52 लाखांची निकृष्ट सुपारी जप्त 

नागपूर शहरात लागू असलेल्या अपर पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेश कलम 37 (1) महा. पो. कायद्याचे उल्लंघन केल्याने तसेच विनापरवाना प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून फिरताना आढळल्याने त्याचे हे कृत्य भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 भाहका सहकलम 135 मपोकाप्रमाणे होत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाही परिमंडळ क्रमांक 4च्या पोलिस उपायुक्त निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर, पोलिस उपनिरीक्षक फड, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष ठाकरे, शैलेश, विकास इंगळे, मनोज नेवारे, आशिष राऊत, हंसराज पाउलझगडे यांनी केली.