जीने की तमन्ना थी, अब...मरने का इरादा है...’! डबे पोहोचवणाऱ्या अन्नदात्यांची काय आहे व्यथा?

dabewala
dabewala

नागपूर : मुंबईचे डबेवाले जगप्रसिद्ध आहेत. ते "मॅनेजमेंट गुरू' म्हणून ओळखले जातात. इंग्लंडच्या प्रिन्स चार्ल्सनी त्यांची भेट घेतली. सहाराष्ट्राच्या राजधानीप्रमाणेच उपराजधानीतही डबेवाल्यांची संस्कृती रुजली आहे. एक दोन नव्हे तर चक्क शंभरावर जेवणाचे डबे पोहोचवणारे "अन्नदूत' नागपूरात आहेत.

नागपुरातील अनेक दुकानात वेळेवर जेवणाचा डबा पोहोचवण्याच्या व्यवस्थापनातून या बेरोजगारांनी स्वतःच्या जगण्याचे नवे अर्थशास्त्र निर्माण केले. मात्र कोरोनामुळे सहा महिन्यांपासून डबेवाल्यांकडून डबाच घेतला जात नाही. एका दिवसाला ५० डबे पोहोचवणारे अन्नदूत केवळ पाच डबे पोहोचवत असल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. कोरोना काळात धंदा बंद पडल्याने अनेक डबेवाले व्यसनाच्या विळख्यात अडकले, एका डबेवाल्याशी संवाद साधला असता, मद्याच्या नशेतच ‘जीने की तमन्ना थी, अब...मरने का इरादा है...’ असे उत्तर त्याने दिले.

नागपूरात डबेवाल्या संस्कृतीची सुरुवात जरिपटका येथून होते. येथील प्रत्येक व्यापाऱ्याच्या बंगल्यावरून त्यांचा डबा घ्यायचा तो पोहोचवून द्यायचा. आणि परत आणायचा. असा या डबेवाल्यांचा दिनक्रम.

मुंबईच्या डबेवाल्यांच्या तुलनेत उपराजधानीतील डबेवाला अत्यंत गरीब आहे. एक डबा पोहोचवण्यासाठी केवळ दोन किंवा तीन रुपये तो घेतो. "चार-दोन' रुपयासाठी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता, कडाक्‍याच्या थंडीची तमा न बाळगता, धो-धो पावसातही सायकल चालवतत दुकाना-दुकानात तो डबे पोचवतो. डबे पोहोचवणाऱ्या या अनोख्या व्यवस्थापन कौशल्याची माहिती मात्र नागपूरकरांना नाही.

नागपूरी डबेवाले म्हणून त्यांचीही दखल घेतली जाऊ लागली होती, मात्र दहा ते बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाला अचानक कोरोना विषाणूची नजर लागली आणि त्यांचे जगणेच थांबले. तरीही नागपुरी डबेवाल्यांनी उमेद सोडली नाही. हळुहळु ॲनलॉक सुरू झाल्यानंतर एक-दोन डब्यांपासून नव्याने सुरूवात केली आहे. त्यांच्या जगण्याला बळ मिळावे एवढेच.

कोरोनाने डबेवाल्यांना बनवले भाजीपाला विक्रेते
एका दुकानात रिकामा डबा घेण्यासाठी आलेल्या नागपूरच्या डबेवाल्याला बोलते केले. रोजीरोटी हिसकावली गेल्याचे दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. नाव संतोष अरमानी. मुळचा हुडको कॉलनी येथील. वय चाळीशीकडे झुकलेलं. रामदासपेठ, बर्डी परिसरातील विविध दूकानांमध्ये डबे पोहोचवणारा हा अन्नदूत. अवघ्या दोन तासात सत्तर ते ऐंशी दुकानात "डबे' पोहोचवतो. तेही वेळेत. एका डब्यावर महिन्याला दिडशे रुपयाची मिळकत होते. असे शंभर डबेवाले नियोजनबद्ध रितीने उपराजधानीत अन्नदूत म्हणून काम करीत असल्याचे तो म्हणाला, लॉकडाऊनच्या काळात साऱ्या डबेवाल्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय केल्याने जगता आले, असे करमानी म्हणाले.

साहब फोटो मत लो....
नागपूरचाचा डबेवाला कोणाच्या पदरीचा नोकर नाही, तोच मालक आणि तोच कामगार आहे, हे विशेष. दुकान बंद त्या दिवशी डबेवाल्याला सुटी. नागपूरी डबेवाले उच्चशिक्षित नाहीत. मात्र मुंबईच्या तुलनेत नागपूरी डबेवाल्यांच्या वेळेचे व्यवस्थापनात तसुभरही कमी नाही.
सकाळी ११ वाजता जरिपटका, वर्धमाननगर, राजनगर येथून व्यापारी, दुकानदार, कंपनीमालक असलेल्या ग्राहकांचे जेवणाचे तयार डबे त्यांच्या घरून घेऊन हे डबेवाले निघतात. वेळेत डबा पोहोचवण्याचे आव्हान असल्याने वेळेच्या नियोजनाचे गणित जुळवतात. अशावेळी मध्ये कोणी क्षणभर रोखण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना रोखता येत नाही. आणि ते थांबतही नाही.

जरिपटका, इंदोरा, खामला, वर्धमाननगर, राजनगर येथील व्यापाऱ्यांची दुकाने सीताबर्डी, इतवारी, गांधीबाग भागात आहेत. घरापासून किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरावर घर असल्यामुळे दुकान सोडून जाणे दुकानदारांना, व्यापाऱ्यांना परवडत नाही. घरुन डबे आणण्यासाठी नोकरवर्ग असेलच असे सांगता येत नाही. येथूनच डबेवाला संस्कृतीचा जन्म नागपुरात झाल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान या डबेवाल्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता, साहब फोटो मत लो....अशी विनवणी त्याने केली.


कोरोनापुर्वी असा होतो दिनक्रम…

  • सकाळी १० वाजता घरून निघायचे
  • मालकाच्या घरून दोन तासांमध्ये भरलेले डबे घ्यायचे
  • दुपारी १२ ते २ या वेळात डबे पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडायची
  • डबे पोहोचवण्यासाठी दररोजचा ५० किलोमीटरचा प्रवास
  • एका डब्यावर तीन ते पाच रुपयांची मिळकत होती..
  •  

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com