नागपुरातून धावणार बुलेट ट्रेन, केंद्रीय मंत्री गडकरींनी दिले संकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

नागपूर : आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, तंत्रशिक्षण, पायाभूत सुविधांसह शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. अजनी येथे शहराच्या मध्यभागी जागतिक स्तरावरचे मल्टिमॉडेल हब तयार करण्यात येणार असून भविष्यात ते बुलेट ट्रेनसाठी उपयोगात येईल, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातून बुलेट ट्रेनचे संकेत दिले.

नागपूर : आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, तंत्रशिक्षण, पायाभूत सुविधांसह शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. अजनी येथे शहराच्या मध्यभागी जागतिक स्तरावरचे मल्टिमॉडेल हब तयार करण्यात येणार असून भविष्यात ते बुलेट ट्रेनसाठी उपयोगात येईल, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शहरातून बुलेट ट्रेनचे संकेत दिले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या लिबर्टी चौक ते मानकापूर व छावनी ते काटोल नाका या उड्डाणपुलाचे लोकार्पण मानकापूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. व्यासपीठावर महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्षनेते संदीप जाधव, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, एनएचएआयचे प्रादेशिक अधिकारी नरेश वडेटवार आदी उपस्थित होते.
 

Image may contain: 11 people, people smiling, people standing
मानकापूर : रिमोटची कळ दाबून उड्डाणपुलाचे लोकार्पण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शेजारी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर संदीप जोशी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार गिरीश व्यास, माजी आमदार सुधाकर देशमुख.

मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे राज्य सरकार व केंद्रात मी असल्यामुळे केंद्र सरकारकडून नागपूरचा विकास कसा करता येईल याचाच विचार केल्याचे गडकरी म्हणाले. दोन्ही सरकारकडून अनेक प्रकल्प सुरू केले. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे असून दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू होईल. ब्रॉडगेज मेट्रोही मंजूर झाली असून नागपूर-वडसा, रामटेक, गोंदिया, सावनेर, अमरावती भागात ब्रॉडगेज मेट्रो सुरू होईल. त्यामुळे परिवहन सेवेत सुधारणा होईल, असेही ते म्हणाले. अजनी येथे फूड कार्पोरेशन व मध्यवर्ती कारागृहाच्या जागेसह जागतिक स्तरावरचे मल्टिमॉडेल हबचे एक हजार कोटीची निविदा निघाली. शहरात एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत तसेच सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी यांच्या स्थापनेमुळे शैक्षणिक विकास होत आहे.

Image may contain: night and outdoor

शैक्षणिक विकासासोबतच सुरेश भट सभागृह, खासदार क्रीडा महोत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव यांच्या माध्यमातून सांस्कृतिक विकास साधला जात आहे. शहरात 350 क्रीडांगणे बांधण्यात येणार असून खासदार सांस्कृतिक महोत्सवाची यशस्वी वाटचाल बघून येत्या काळात सहा विधानसभा क्षेत्रात असे सहा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. लिबर्टी चौकात हा पूल खाली येत असून तेथे सिग्नल प्रणाली आवश्‍यक असून तज्ज्ञांच्या मदतीने हा गुंता सोडवावा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

भूमिपूजन केले, लोकार्पणही केले : फडणवीस
या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी सुटणार आहे. गेल्या पाच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा बदलला. आधीच्या सरकारमध्ये भूमिपूजन झाल्यानंतर दोन-तीन सरकारे गेली तरी लोकार्पण होत नव्हते. मात्र, गडकरी यांनी या पूलाचे भूमिपूजनही केले अन्‌ लोकार्पणही केले, असे नमूद करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले.

क्लिक करा - 'झुंड'चे नायक का झाले 'मूकनायक'

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bullet train to be start from nagpur said gadkari