'हनी ट्रॅप' प्रकरणासंबंधी गृहमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, वाचा काय आहे प्रकरण... 

अतुल मेहेरे  | Friday, 17 July 2020

गृहमंत्री म्हणाले, त्या ऑडिओ क्‍लिपमध्ये न्यायाधीशांनाही "मॅनेज' केल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाची चौकशी आम्ही सुरू केली आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून ही चौकशी होणार आहे. पण, आश्‍चर्याची बाब म्हणजे साहिल सैय्यद हा भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख यांच्याबरोबर तो राहतो.

नागपूर : महापौर संदीप जोशी आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्यासंदर्भात जी ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यामध्ये संभाषण करीत असलेला साहील सैय्यद नामक व्यक्ती आणि भारतीय जनता पक्षाचे नेत्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. तोच साहिल जर महापौर आणि नगरसेवकांना फसवण्यासाठी कटकारस्थान करीत असेल तर मला वाटते हे भाजपचे अंतर्गत राजकारण आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (ता. 17) सांगितले. 

गृहमंत्री म्हणाले, त्या ऑडिओ क्‍लिपमध्ये न्यायाधीशांनाही "मॅनेज' केल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणाची चौकशी आम्ही सुरू केली आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून ही चौकशी होणार आहे. पण, आश्‍चर्याची बाब म्हणजे साहिल सैय्यद हा भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर देशमुख यांच्याबरोबर तो राहतो. त्यांच्यासोबत त्याचे अनेक फोटो आहेत. काही लोक असेही सांगतात की, या नेत्यांसोबत त्याचे व्यावसायिक संबंध असून, तो त्यांचा भागीदार आहे. असे असताना हा व्यक्ती जर त्यांच्याच पक्षाचे महापौर आणि नगरसेवकांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचे कटकारस्थान जर रचत आहे, तर यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वादाचा प्रश्‍न दिसतो. उच्चस्तरीय चौकशीमध्ये सत्य काय ते उघड होणार आहे. 

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...
 

हे प्रकरण घडल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशी करण्यासंर्भात पत्र दिले होते. त्या पत्राला गृहमंत्र्यांनी 14 जुलैला उत्तर दिले आहे. त्यामध्येही उपरोक्त उल्लेख केलेला आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आपण स्वतः वैयक्तिक स्तरावर या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे सांगितले होते. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. पुराव्यांचाही शोध सुरू आहे, ते हाती येताच हा साहील कोण आहे आणि कुणाच्या इशाऱ्यावरून तो हे काम करतोय, हे स्पष्ट होईल. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण आपण जगासमोर आणणार असल्याचेही तिवारी म्हणाले होते. 

साहीलच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे आता पुढे येऊ लागली आहेत. तो कुठे लपून बसला त्याचाही पोलिस शोध घेत आहे. महाआघाडीत सहभागी असलेल्या एका पक्षाच्या बड्या नेत्याच्या घरी तो दडून बसला असल्याचे आपल्या सूत्राकडून कळले. मात्र, हा विषय पोलिसांचा आहे. आज ना उद्या तो त्यांच्या हाती लागेलच, असेही तिवारी यांनी सांगितले होते. त्यामुळे साहील सैय्यद नेमका कोणत्या पक्षाशी संबंधित आहे, हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हनी ट्रॅप ऑडिओ क्‍लिप प्रकरण साहिल सैय्यदच्या भोवताल फिरत आहे. त्यामुळे तो पोलिसांच्या हाती लागेपर्यंत तरी या प्रकरणाचा तपास पुढे सरकणार नाही, असे बोलले जात आहे.